हर्षवर्धन पाटील शरद पवार भेटीवर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? खरंच तुतारी हातात घेणार का?

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.
इंदापूरमधून अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने गेली काही वर्ष भाजपसोबत घरोबा असलेले हर्षवर्धन पाटील वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहेत.
हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली. हर्षवर्धन पाटील खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेण्याच्या मार्गावर आहेत का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोण कोणाची भेट घेत आहे, हे महत्वाचे नाही. भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात लोक प्रवेश करत आहेत. मागच्या आठवड्यात अनेकांनी प्रेवश केला. त्याआधीच्या आठवड्यातही अनेकांनी पक्षप्रवेश केला. यापुढेही भारतीय जनता पक्षात खूप प्रवेश होतील.
हे खरं आहे की निवडणुकीच्या काळात काहीजण इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे येतात. मात्र, मला विश्वास आहे की, हर्षवर्धन पाटील असतील किंवा आमचे इतर नेते असतील ते आमच्याबरोबरच राहतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.