उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आवाहनानुसार आमदार माऊली कटके यांचे उपोषण मागे; वाघोली-आव्हाळवाडी रस्त्याच्या कामाला अखेर प्रशासकीय मंजुरी..

उरूळीकांचन : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या वाघोली ते आव्हाळवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग ५६ च्या दुरुस्तीसाठी अखेर प्रशासनाला जाग आली आहे. आमदार माऊली आबा कटके यांनी आज पुकारलेल्या लाक्षणिक उपोषण आंदोलनानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने या रस्त्याच्या कामाला आणि निधीला तातडीने मंजुरी दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या मध्यस्थीनंतर, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लिंबूपाणी घेऊन या उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली. या निर्णयामुळे वाघोली, आव्हाळवाडी आणि परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे अत्यंत गंभीर बनला होता. याबाबत आमदार माऊली आबा कटके यांनी शासन, पीएमआरडीए तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून, बैठका घेऊन आणि प्रत्यक्ष भेटून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने आणि कागदी घोडे नाचवले जात होते. प्रत्यक्ष कामाला मंजुरी देण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती आणि संबंधित विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे हे काम रेंगाळले होते.

नागरिकांच्या या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आमदार माऊली आबा कटके यांनी अखेर आज, ८ जून २०२६ रोजी प्रत्यक्ष उपोषण सुरू केले. या आंदोलनामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली आणि प्रलंबित प्रस्तावावर तातडीने कार्यवाहीची चक्रे फिरली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वतः या विषयाची गंभीर दखल घेतली. त्यांनी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे कडक निर्देश दिले. वाघोली-आव्हाळवाडी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कोणत्याही विलंबाशिवाय सुरू करण्यात यावे आणि नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी त्यांनी विशेष लक्ष घालत प्रशासनाला तातडीने पावले उचलण्यास भाग पाडले.

त्यानंतर प्रशासनाने रस्ता कामासाठी आवश्यक असणारा निधी मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा दूरध्वनी आल्यानंतर त्यांनी जिल्हा जियोजन मधून या कामासाठी त्वरित निधी उपलब्ध करून दिला आहे आणि प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाहीची ठोस हमी मिळाल्यानंतर आंदोलनाची भूमिका यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले. अखेर घटनास्थळी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते आमदार माऊली आबा कटके यांनी लिंबूपाणी घेऊन आपले उपोषण मागे घेतले.
या यशानंतर बोलताना आमदार माऊली आबा कटके म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांनपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नव्हते, त्यामुळे नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी मला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्काने लोकशाहीचा मार्ग स्विकारून उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला. उपोषणाला बसल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत कामास मंजुरी दिली याचे समाधान आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचना दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष आभार मानले. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, केवळ मंजुरी मिळणे पुरेसे नाही, तर प्रत्यक्ष काम तातडीने सुरू होऊन निर्धारित वेळेत पूर्ण झाले पाहिजे आणि नागरिकांच्या विकासासाठी व मूलभूत सुविधांसाठी हा संघर्ष यापुढेही सुरू राहील.
या आंदोलनाला आणि संघर्षाला पाठिंबा देणाऱ्या सर्व नागरिक, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि प्रसारमाध्यमांचे आमदार माऊली आबा कटके यांनी मनःपूर्वक आभार मानले. जनतेच्या प्रश्नांसाठी सुरू केलेला हा लढा जनतेच्या पाठबळामुळेच यशस्वी झाला असून, आता मंजूर कामाची प्रभावी अंमलबजावणी होऊन रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी पुढील पाठपुरावा अविरत सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाघोली-आव्हाळवाडी रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.