NEET पेपरफुटी प्रकरणाला मोठे वळण! ‘मुख्य आरोपी’ ठरलेल्या संजीव मुखियाला CBIची क्लिनचीट; आंदोलनादरम्यान मोठा खुलासा


नवी दिल्ली : देशभरात NEET-UG 2024 पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांचा संताप कायम असतानाच या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) कथित मुख्य आरोपी संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया याला या प्रकरणात क्लिनचीट दिली आहे. तपासादरम्यान त्याचा प्रश्नपत्रिका चोरी, गळती किंवा वितरणाच्या कटाशी कोणताही संबंध आढळून न आल्याने त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याचे CBIने स्पष्ट केले आहे.

NEET-UG पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात आंदोलनाची लाट उसळली आहे. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलन सुरू असून विविध विद्यार्थी संघटना तसेच विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनादरम्यानच CBIच्या तपासातील हा महत्त्वाचा खुलासा समोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

CBIने दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये बिहार पोलिसांनी NEET-UG परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा गुन्हा उघडकीस आणत तपास सुरू केला होता. सुरुवातीच्या तपासात संजीव मुखियाचे नाव संशयित म्हणून पुढे आले होते. यापूर्वी विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांशी त्याचे नाव जोडले गेल्यामुळे बिहार पोलिसांनी एफआयआरमध्ये त्याचा समावेश केला होता.

मात्र, प्रकरणाचा तपास CBIकडे वर्ग झाल्यानंतर तपास यंत्रणेने संपूर्ण कटाचा सखोल तपास केला. प्रश्नपत्रिका चोरी, ती उमेदवारांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातून आर्थिक फायदा मिळवणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्यात आली. या तपासाअंती CBIने पाटणा येथील सक्षम न्यायालयात एकूण 45 आरोपींविरुद्ध विविध आरोपपत्रे दाखल केली. मात्र या संपूर्ण कटात संजीव मुखियाचा सहभाग असल्याचा कोणताही ठोस पुरावा तपासादरम्यान समोर आला नसल्याचे CBIने स्पष्ट केले.

तपास सुरू असताना संजीव मुखिया काही काळ फरार होता. नंतर बिहार पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर CBIनेही त्याची सखोल चौकशी केली. मात्र चौकशीदरम्यान प्रश्नपत्रिका चोरी, गळती किंवा वितरणाशी त्याचा थेट संबंध सिद्ध करणारा कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही आणि न्यायालयाने त्याला जामीनही मंजूर केला.

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, परीक्षेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन अद्याप कायम आहे. CBIच्या या खुलाशानंतर तपासाच्या दिशेबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत देशभरात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!