अजितदादांवरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, नगरसेवक किशोर मासाळ यांची थेट हकालपट्टी


बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे बारामती नगर परिषदेचे नगरसेवक किशोर मासाळ अखेर अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या वक्तव्यावरून बारामतीतील राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कठोर भूमिका घेत मासाळ यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

किशोर मासाळ यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. संबंधित वक्तव्य हे बारामतीकरांच्या भावना दुखावणारे आणि पक्षाच्या मूल्यांशी विसंगत असल्याची भावना स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर बारामती नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकत्र येत मासाळ यांच्या नगरसेवक पदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

यासाठी नगरसेवकांनी सह्यांचे निवेदन तयार करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सचिन यादव यांच्याकडे सुपूर्द केले. या निवेदनावर नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, गटनेते संजय संघवी, उपगटनेते संपदा चौधर, प्रतोद विशाल हिंगणे, सभापती अमर धुमाळ यांच्यासह अनेक नगरसेवक आणि नगरसेविकांच्या सह्या होत्या. त्यामुळे या प्रकरणात स्थानिक नेतृत्वाने एकसंघ भूमिका घेतल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे, कारवाईच्या एक दिवस आधी किशोर मासाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. रोहित पवार यांच्या सोशल मीडिया टीमकडून आपला राजीनामा घेण्यासाठी बारामतीत वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार किंवा जय पवार यांनी अद्याप आपल्या राजीनाम्याची मागणी केलेली नसल्याचे सांगत, “मी नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली होती.

मात्र, त्यांच्या या भूमिकेनंतर दुसऱ्याच दिवशी पक्ष नेतृत्वाने निर्णायक पाऊल उचलले. मुंबईतील पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी संबंधित वक्तव्य अत्यंत घृणास्पद आणि निषेधार्ह असल्याचे सांगत मासाळ यांच्यावर हकालपट्टीची कारवाई जाहीर केली. पक्षशिस्त भंग करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.

दरम्यान, तटकरे यांनी छगन भुजबळ यांच्या कथित नाराजीबाबतही भाष्य केले. भुजबळ हे पक्षाचे संस्थापक नेते असून ते आपल्या शैलीत भावना व्यक्त करत असतात, असे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन सोहळा १० जूनऐवजी ११ जून रोजी मुंबईतील शण्मुखानंद सभागृहात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मासाळ यांच्यावरील कारवाईनंतर बारामतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!