जेजुरी दर्शनाहून परतीचा प्रवास ठरला काळाचा घाला! सुरूरजवळ बोलेरोचा भीषण अपघात; २ ते ३ भाविक गंभीर जखमी

वाई : खंडोबाच्या दर्शनाचा आनंद घेऊन गावी परतणाऱ्या भाविकांचा प्रवास सातारा–पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताने अचानक थांबला. सुरूर (ता. वाई) गावाच्या हद्दीत बोलेरो वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून गाडी थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली आणि काही क्षणातच आनंदाचा प्रवास दुर्घटनेत बदलला. या अपघातात एकूण ८ ते १० भाविक प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती असून त्यापैकी २ ते ३ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे.

रविवार, ७ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजता ही दुर्घटना सुरूर येथील साई पार्क इन हॉटेलसमोर घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघाताचा आवाज इतका मोठा होता की आसपासचे नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. बोलेरो वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा परिसरातील संदीप संपत शिरतोडे, महादेव मोहन मदने आणि त्यांचे काही नातेवाईक जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर सर्वजण बोलेरो वाहनातून गावी परतत होते. प्रवासादरम्यान वाहनात एकूण आठ ते दहा जण होते.

सुरूर गावाजवळ येताच अचानक भरधाव वेगातील बोलेरोवरील चालकाचे नियंत्रण सुटले. गाडी रस्त्यावरून घसरत थेट महामार्गावरील डिव्हायडरवर जाऊन आदळली. धडकेनंतर वाहनात मोठा गोंधळ उडाला. काही प्रवासी जोरदार धडकेमुळे वाहनात अडकून पडले, तर काही जखमी अवस्थेत बाहेर फेकले गेले.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि महामार्गावरील मदत पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. सर्व जखमींना प्रथम कवठे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी २ ते ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघातामुळे सातारा–पुणे राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त बोलेरो बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झालेला पुढील भाग पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या अपघाताचे नेमके कारण, चालकाचा वेग, तसेच वाहनावरील नियंत्रण सुटण्यामागील कारणांचा तपास सुरू आहे.
देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर ओढावलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आनंदाच्या प्रवासाचा शेवट अशा दुर्दैवी अपघातात झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.