“अजितदादांची झलक! सुनेत्रा पवारांचा बारामती मेडिकल कॉलेजवर धडक तपासणी दौरा; अधिकाऱ्यांची घेतली खरडपट्टी

बारामती : बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अचानक धडक देत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली. रुग्णालयातील अस्वच्छता, अपुरी व्यवस्था आणि रुग्णांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्णालयाला भेट दिली. या अचानक भेटीमुळे रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील स्वच्छता, सुविधा आणि कर्मचारी वर्गाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आगमनाची कोणतीही माहिती प्रशासनाला नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अक्षरशः धावपळ उडाली.
रुग्णालय परिसराची पाहणी करताना सुनेत्रा पवार यांनी विविध विभागांना भेट दिली. यावेळी काही ठिकाणी अस्वच्छता आणि दुर्लक्षित व्यवस्था दिसून आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला. “ही स्वच्छता आहे का? रुग्णालयाची अशी अवस्था का झाली आहे? तुम्ही दिवसभर नेमकं काय काम करता?” अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. “आताच्या आता सुधारणा करा. पुन्हा अशी परिस्थिती दिसता कामा नये. जबाबदार कोण आहेत त्यांची नावे नोंदवा,” असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

यावेळी काही कर्मचारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त करत कामाच्या वेळेत जबाबदारीने काम करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या रोखठोक प्रश्नांमुळे आणि कठोर भूमिकेमुळे उपस्थित अधिकारी व कर्मचारी काही काळ गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आले.
सुनेत्रा पवार यांची ही कार्यपद्धती पाहून अनेकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामकाजाची आठवण झाली. प्रशासनावर मजबूत पकड, थेट संवाद आणि चुका झाल्यास समोरासमोर जाब विचारण्याची शैली ही अजित पवार यांची ओळख मानली जाते. बारामतीतील या पाहणीदरम्यान सुनेत्रा पवार यांच्यातही त्याच धडाडीची झलक पाहायला मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, पाहणीदरम्यानचा त्यांचा अधिकाऱ्यांना सुनावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्याची चर्चा सुरू आहे. अनेकांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले असून रुग्णालयातील व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.