एसटीचा प्रवास आणखी महागणार? नवीन प्रस्ताव वाहतूक विभागाकडून सादर, प्रवाशांना फटका बसणार…

मुंबई : एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई कराचा भार लादण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने सादर केला आहे. हा प्रस्ताव महामंडळाचे नवे अध्यक्ष, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळल्यास एसटी महामंडळाचा प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काळात दर वाढण्याची शक्यता आहे.
यामुळे आता महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सामान्यांच्या खिशावर आणखी एक भार पडणार आहे. महाराष्ट्राच्या परिवहन व्यवस्थेची लाइफलाईन समजली जाणाऱ्या एसटी महामंडळाकडून तिकिटाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाकडून आता साफसफाई अधिभार लावला जाण्याची शक्यता आहे.
यामुळे आता तिकीट दरवाढीने प्रवाशांचा खिसा हलका होत असताना एसटीच्या तिकिटांवर एक रुपयाचा भुर्दंड लादला जाणार असल्याची शक्यता आहे. एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई कराचा भार लादण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने सादर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर विचार केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांच्या संख्येत मागील काही महिन्यात घट झाली आहे. त्यामुळे प्रवाशी उत्पन्नावरही परिणाम होऊ लागला आहे. एसटी महामंडळाने 25 जानेवारीपासून सर्व प्रकारच्या सेवांमध्ये 14.95 टक्क्यांची भाडेवाढ लागू करण्यात आली. जनतेच्या तीव्र नाराजीनंतरही भाडेवाढ मागे घेण्यात आली नाही.
त्यानंतर आता या तिकीट दरवाढीनंतर प्रवाशांच्या संख्येवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ नागरीक आणि महिलांना तिकिट दरात सवलत असली तरी राज्य सरकारकडून या सवलत शुल्काची प्रतिपूर्ती महामंडळाला करण्यात येते. त्यामुळे तिकीट दरवाढीचा परिणाम सरकारी तिजोरीवर होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.