पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका उडणार? ‘पेट्रोल 170, डिझेल 150 रुपये होईल’; नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण

मुंबई : राज्यासह देशभरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीवरून राजकीय वातावरण तापले आहे. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचे चित्र असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी इंधनाच्या किमतींबाबत मोठा दावा केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी येत्या दीड महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली. “पुढील काही आठवड्यांत डिझेल 150 रुपये आणि पेट्रोल 170 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचू शकते,” असा दावा त्यांनी केला. तसेच देशातील आर्थिक आणि इंधनविषयक परिस्थितीवरून केंद्र सरकारवरही त्यांनी टीका केली.
राज्यात अनेक ठिकाणी इंधन तुटवड्याच्या तक्रारी समोर येत असल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “इंधनाचा तुटवडा नसल्याचा दावा केला जात असला तरी अनेक पेट्रोलपंपांवर पुरवठ्याची समस्या दिसून येत आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी निवडणूक आयोग, एसआयआर प्रक्रिया, मराठा आरक्षण आणि राज्यातील इतर राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. कर्नाटकातील नेतृत्व बदलाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वडेट्टीवार यांच्या इंधन दरांबाबतच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून सरकारकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.