दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; १ लाख रिक्षांचे वाटप, सुरुवातीचा मुहूर्तही ठरला

मुंबई : दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारकडून नवी योजना राबवण्याची तयारी सुरू आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना तब्बल १ लाख रिक्षांचे वाटप करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या योजनेत शेतकऱ्यांना रिक्षा खरेदीसाठी ९० टक्के कर्ज आणि १० टक्के अनुदान दिले जाणार आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. याच महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यातील आरटीओ विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

दरवर्षी २० हजार रिक्षांचे वाटप
या योजनेंतर्गत दरवर्षी २० हजार रिक्षांचे वाटप करण्याचे नियोजन आहे. पात्र लाभार्थ्यांना रिक्षा खरेदीसाठी ९० टक्के कर्ज आणि १० टक्के अनुदान मिळणार आहे. याशिवाय रिक्षाधारकांना आरटीओची फी माफ करण्यात येणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या योजनेचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

लॉटरी पद्धतीने होणार लाभार्थ्यांची निवड
राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार असून, म्हाडाच्या घरांच्या सोडतीप्रमाणे लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. तसेच, ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला रिक्षा मिळेल, त्याला त्याच जिल्ह्यात रिक्षा वापरता येणार आहे.

९ फेब्रुवारीपासून योजनेची सुरुवात करण्याचे नियोजन
९ फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून, याच दिवसापासून या रिक्षावाटप योजनेची सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. ‘अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त रिक्षा सन्मान योजना’ या नावाने ही योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मात्र, या योजनेचा प्रस्ताव अद्याप मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांच्या निवडीबाबत पुढील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
