कांद्याचे बाजारभाव कोसळले; नऊ दिवसांत मोठी घसरण, दुष्काळात शेतकऱ्यांना दुहेरी फटका

मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोरील अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, अवघ्या नऊ दिवसांत प्रतिक्विंटल तब्बल १ हजार ७४९ रुपयांनी भाव कमी झाले आहेत. कांद्याचे दर आता थेट ४ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. आधीच दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दरातील घसरणीचा दुहेरी फटका बसत आहे.
लासलगाव बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घट होत आहे. नऊ दिवसांत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पादनासाठी केलेला खर्च आणि मिळणारा बाजारभाव यांचा ताळमेळ बसवणे शेतकऱ्यांसाठी कठीण होत आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत असल्याने दरांवर दबाव निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याचाही परिणाम भारतीय कांद्याच्या बाजारभावावर होत असल्याचे सांगितले जात आहे.

दरातील या घसरणीमुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बाजारभावात स्थिरता आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आता सरकार कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

