रायगडावरून एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; ‘संविधान धोक्यात म्हणणाऱ्यांचंच अस्तित्व धोक्यात’


पुणे : संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. रायगड दौऱ्यावर असताना त्यांनी संविधान धोक्यात असल्याचा आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. ‘संविधान धोक्यात म्हणणाऱ्यांचंच अस्तित्व धोक्यात आलं आहे,’ अशा शब्दांत शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. देशातील १४० कोटी जनता सुज्ञ असून भारतीय संविधान चंद्र-सूर्य असेपर्यंत कायम राहील, असेही त्यांनी म्हटले.

रायगडावर स्वच्छता अभियानाचे आयोजन
संविधान दिनाचे औचित्य साधून रायगडावर बाळासाहेब ठाकरे गड-किल्ले स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या उपक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि खासदार सहभागी झाले होते. हजारो कार्यकर्ते स्वतःहून या अभियानात सहभागी होऊन किल्ल्यांची स्वच्छता करतात. हे अभियान पुढे लोकचळवळ बनेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

‘विरोधकांना संविधान दिन कधी आठवलाच नाही’
विरोधकांच्या संविधानविषयक भूमिकेवर टीका करताना शिंदे म्हणाले की, संविधान दिन जाहीर करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये घेतला. त्यानंतर देशभरात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र, आता संविधान धोक्यात असल्याचे सांगणाऱ्यांना यापूर्वी संविधान दिनाची आठवण झाली नव्हती, असा आरोप त्यांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगभरातील घटनांचा अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मिती केली. देशाचे कामकाज याच संविधानाच्या आधारे चालते. समाजातील शेवटच्या घटकाला आणि शोषित-वंचितांना न्याय मिळणे हा संविधानाचा मुख्य उद्देश असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाबाबतही भाष्य
यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाडमधील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या विकासकामाचाही उल्लेख केला. राज्य सरकारकडून चवदार तळ्याचे सुशोभीकरण करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. संविधान दिनाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवण्याबरोबरच ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व असलेल्या स्थळांचे जतन करण्यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!