शरद पवारांच्या भेटीसाठी आधी सुप्रिया सुळे, त्यानंतर प्रफुल्ल पटेल रुग्णालयात; राष्ट्रवादीत नव्या राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवासामुळे झालेल्या दगदगीमुळे त्यांना डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
पवार रुग्णालयात दाखल झाल्याचे समजताच खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरू असलेली बैठक सोडून तातडीने रुग्णालय गाठले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही रुग्णालयात जाऊन पवारांची भेट घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आणण्यात आले. सुरुवातीला ते नियमित तपासणीसाठी आल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रवासातील दगदगीमुळे त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली.

यावेळी शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पवारांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे यांनी बैठक सोडून रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, रोहित पवार बैठकीतच थांबले. त्यांच्या या निर्णयाचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीने चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे रुग्णालयात पोहोचल्यानंतर काही वेळाने प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवारांची भेट घेतली. पटेल यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का? शरद पवार काही महत्त्वाचा राजकीय निर्णय घेणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, या चर्चांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
यापूर्वीही शरद पवार रुग्णालयात दाखल झाले असताना प्रफुल्ल पटेल यांनी दुसऱ्या दिवशी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यामुळे यावेळच्या पटेल यांच्या भेटीकडेही राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
रोहित पवारांची सुनेत्रा पवारांवर टीका
दरम्यान, रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यापूर्वी सुनेत्रा पवार यांच्याबाबत जपून भूमिका मांडणारे रोहित पवार यांनी यावेळी थेट टीका केली.
सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्याप्रमाणे काम करता येत नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले. एकीकडे शरद पवार यांच्या रुग्णालयातील दाखल होण्याची चर्चा, तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील नेत्यांच्या भेटीगाठी आणि रोहित पवारांची टीका यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
