लोणी काळभोरमध्ये गावठी दारू विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त; एकाला अटक, गुन्हे शाखेच्या युनिट सहाची कारवाई

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील सिद्राममळा परिसरात कॅनॉलजवळ झाडाच्या आडोशाला सुरू असलेल्या गावठी दारू विक्रीच्या अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट सहाने छापा टाकला. या कारवाईत एका तरुणाला अटक करण्यात आली असून, गावठी दारू आणि रोख रकमेसह एकूण १ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुर्गेश तानाजी धायगुडे (वय २९, रा. नांदेपाटील वस्ती, सिद्राममळा, लोणी काळभोर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २५) गुन्हे शाखेचे पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते. त्यावेळी सिद्राममळा येथील कॅनॉलजवळ एक व्यक्ती गावठी हातभट्टीची दारू विकत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे युनिट सहाच्या पथकाने लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छाप्यादरम्यान धायगुडे हा प्लास्टिकच्या पाण्याच्या जारमध्ये गावठी दारू ठेवून ग्राहकांना विक्री करत असल्याचे आढळले. पोलिसांची चाहूल लागताच दारू पिण्यासाठी आलेल्या नागरिकांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे १ हजार ५०० रुपये किमतीची गावठी दारू आणि ४७० रुपये रोख रक्कम जप्त केली.

दारूचा नमुना तपासणीसाठी सीलबंद करण्यात आला असून, उर्वरित दारू घटनास्थळीच नष्ट करण्यात आली. याप्रकरणी दुर्गेश धायगुडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

