रोहित पवारांना पक्षातून पहिला धक्का? शरद पवार गटाच्या बैठकीत मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून मोर्चा काढणार आहेत. मात्र, या मोर्चाला पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा पूर्ण पाठिंबा आहे की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
बुधवारी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी आपल्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. तसेच पक्षातील सर्व प्रमुख नेते मोर्चात सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत रोहित पवार यांच्या मोर्चात सहभागी होण्याबाबत जिल्हाध्यक्षांना कोणत्याही थेट सूचना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे रोहित पवार यांच्या मोर्चाबाबत पक्षाची भूमिका काय असणार, याविषयी चर्चा रंगू लागली आहे.

जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत मोर्चाबाबत सूचना नाहीत?
रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चात पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी सहभागी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, आजच्या बैठकीत या मोर्चाबाबत कोणताही स्पष्ट निर्णय किंवा थेट सूचना देण्यात आल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पक्षाकडून रोहित पवार यांना अपेक्षित पाठिंबा मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारविरोधात आक्रमक होण्याचे निर्देश
दरम्यान, आजच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते.
सरकारी योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासोबतच स्थानिक पातळीवर प्रशासनाकडे जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्याची माहिती आहे.
आता रोहित पवार यांच्या मोर्चात पक्षातील वरिष्ठ नेते आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी सहभागी होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
