रोहित पवारांचा सुनेत्रा पवारांना टोला; ‘दादांसारखे काम करता येत नाही’, पुण्याच्या पालकमंत्रिपदावरही भाष्य

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर काही तासांतच आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

पुण्यात २०२५ मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे याच्यावर शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विरोधकांकडून राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर टीका केली जात आहे.

‘सुनेत्रा वहिनींना दादांसारखे काम करता येत नाही’
रोहित पवार यांनी पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर भाष्य करताना सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “सुनेत्रा वहिनींना दादांसारखे काम करता येत नाही. पुण्याला कडक पालकमंत्री द्या. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मात्र, सुनेत्रा काकींना काम करण्यासाठी अधिक ताकद दिली पाहिजे.”

पुण्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिस आयुक्त कोणाचे ऐकतात, असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला. सुनेत्रा पवार यांचा पोलिस प्रशासनावर अपेक्षित वचक जाणवत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यास शहराचे नुकसान होईल, असेही रोहित पवार म्हणाले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
बावनकुळेंचे रोहित पवारांना प्रत्युत्तर
दरम्यान, रोहित पवार यांच्या वक्तव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बोलताना रोहित पवार यांनी किमान योग्य शब्दांचा वापर करावा, असे ते म्हणाले.
सुप्रिया सुळे यांना राजकारणाचा अनुभव आहे आणि त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. मात्र, काही लोकांकडून केवळ टीका केली जात असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार नाहीत, तर सुनेत्रा पवार उत्तम काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांवरून सुरू झालेला हा वाद आता राष्ट्रवादीतील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आणि सत्ताधारी नेत्यांच्या प्रत्युत्तरामुळे अधिक चर्चेत आला आहे.
