शेतकऱ्यांवर पुन्हा टोमॅटो फेकून देण्याची वेळ येणार? टोमॅटो ५० रुपये किलोने विकण्याचा सरकारने घेतला निर्णय..

नवी दिल्ली : देशभरात टोमॅटोच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला होता, त्यामुळे लोकांच्या भाज्या आणि सॅलडच्या ताटातून टोमॅटो गायब होऊ लागले आहेत. एकेकाळी शेतकरी टोमॅटोला दर नसल्याने शेतात फेकून देत होते.
परंतु आज याच टोमॅटोमुळे त्यांना अच्छे दिन आले आहेत. अनेक शेतकरी टोमॅटोच्या विक्रीतून लखपती तर करोडपती झाले आहेत. टोमॅटोमुळे शेतकऱ्यांची जरी चांदी झाली असली तरी महागाईमुळे टोमॅटो सर्वसामान्यांच्या ताटातून गायब झाला आहे.
सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन टोमॅटो खरेदी करावे लागत आहेत. अनेकजण टोमॅटोला पर्याय शोधत आहेत. अशातच आता सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
तुम्ही आता टोमॅटो ५० रुपये किलो दराने विकत घेऊ शकता. केंद्र सरकारने स्वातंत्र दिनाच्या मूहर्तावर सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील एनसीआरमध्ये ५० रुपये किलोने टोमॅटोची विक्री केली जात आहे.
येत्या काळात हे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. जर असे झाले तर याचा सर्वात मोठा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो. दर कमी झाल्याने त्यांच्यावर पुन्हा टोमॅटो फेकून देण्याची वेळ येऊ शकते.
ग्राहक व्यवहार विभागाकडून एनसीसीएफ आणि नाफेडला टोमॅटो ५० रुपये किलो दराने विकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरुवातीला ९० रुपये प्रति किलो दराने टोमॅटो मिळत होते. आता त्यात घट होऊन हे दर ५० रुपये किलो झाले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.