राजीनामा देण्यासाठी मी काय विनयभंग केलाय का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वक्तव्य..

मुंबई : काही दिवसांपूर्वीच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी (पत्ते) खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी तो व्हिडीओ ट्विट केल्यावर प्रचंड खळबळ उडाली होती. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला.

राज्यातील वातावरण पेटल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही हे योग्य नसल्याचे म्हटले. असे असताना एवढं सगळ होऊनही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप किंवा चिंता दिसत नव्हती. रमी खेळण्याच्या मुद्यावरून विरोधकांकाडून कोकाटेंच्या राजनाम्याची मागणी होत असताना ते मात्र यावर गंभीर नाहीत.
हा इतका छोटा विषय आहे. हा विषय लांबला का कळलं नाही. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळता येत नाही असा दावा त्यांनी आज केला. एवढंच नव्हे तर राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काही विनयभंग केला आहे. चोरी केली आहे. माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही.

ते म्हणाले, मी केलं काय ? कोकाटेंनी थेट हात वर केले. ज्या विरोधकाने जो व्हिडीओ काढला त्याला मी कोर्टात खेचणारच आहे. साधा पाय घसरला तरी त्याची चर्चा होते. प्रतिक्रिया सुरू होतात. दारू प्याला असेल, गांजा प्यायला असेल अशा काहीही सोशल मीडियात प्रतिक्रिया येतात. असेही ते म्हणाले. यामुळे मात्र याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

दरम्यान, सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ असो किंवा शेतकऱ्यांबद्दलची आक्षेपार्ह विधाने, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना अडचणीत आणत आहे. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोकाटेंना बोलावून समज द्यावी लागली. मात्र कोकाटे अजून देखील त्यांच्याच भाषेत बोलत असल्याचे दिसून येत आहे.