ठरलं! वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे, बालकल्याण समितीचा मोठा निर्णय..

पुणे : पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती, नणंद, सासू, सासरा आणि दीर यांना अटक केली आहे. मात्र वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचं संगोपन कोण करणार? असा प्रश्न होता, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे माहिती दिली आहे की, पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा ९ महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिका-यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.
यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल.