विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा


नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. वादळी वारा आणि गारपिटीसह झालेल्या पावसामुळे यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांत ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. हवामान खात्याने पावसाचा मुक्काम आणखी दोन दिवस वाढणार असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांना भर उन्हाळय़ात अस्मानी संकटाचा सामना करावा लागणार आहे.

गेल्या तीन दिवसांपासून नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वारा आणि गारपिटीसह मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर शहरात दोन दिवस सोसाटय़ाचा वारा आणि अवकाळी पाऊस कोसळला. इतर जिल्ह्यांत वादळी वारा आणि गारपिटीसह झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला.

सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले आहे. सुमारे ३५ हजार ३८९ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह फळबागांना पाऊस-गारपिटीचा तडाखा बसला. चांदूरबाजार, मोर्शी, वरुड व अचलपूर या चार तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले. १८ हजार ३०० हेक्टरमधील संत्री, मोसंबी, केळी, आंबा यांचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील ७४ गावांमधील चार हजार ६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

बुलढाणा जिल्ह्यात १०० गावांतील सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली. यवतमाळ जिल्ह्यातील अडीचशेवर गावांतील दोन हजार हेक्टरवरील पिकांना पावसाने तडाखा दिला. केळापूर तालुक्यात सर्वाधिक ७८० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. फळबागांनाही मोठय़ा प्रमाणात फटका बसला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!