खासदारकीच्या वर्षपूर्तीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पुणेकरांशी भावनिक संवाद, म्हणाले, तुमचा विश्वास….

पुणे : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या खासदारकीच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले. याबाबत त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्या पुणेकर सुहृदांनो, आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार! खासदारकीचे प्रथम वर्ष आज पूर्ण करीत असताना माझ्या मनात भावनांची गर्दी आहे. दिलेले तुमचे प्रत्येक मत माझ्यावरील विश्वासाची आणि प्रेमाची पावती होती, अशी माझी विनम्र भावना आहे.
या क्षणी आपल्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भावनांना मोकळी वाट करून देतो आहे. पुणेकरांचे प्रेम आणि विश्वास गेली पंचवीस वर्षे मी सातत्याने अनुभवतो आहे. तुमच्या आशीर्वादांच्या बळावरच नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापौरपद आणि आता खासदार हा माझा प्रवास निर्वेध झाला. तुमच्या पाठबळाशिवाय एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला हे सारे लाभणे अशक्य होते, याची नम्र जाणीव माझ्या काळजात सदैव आहे.
मी स्वतःला भाग्यशाली समजतो, की मी अशा विशाल संघ परिवारात आहे, जेथे राष्ट्रभक्तीचा संस्कार रोज केला जातो आणि हा यज्ञ गेली १०० वर्षे अखंड सुरू आहे. त्यातून कोट्यवधींच्या जीवनाला दिशा लाभली. कोट्यवधींच्या मनात समर्पणाचा संस्कार रुजला. मी अशा पक्षात आहे, जेथे कार्यकर्त्याला संधी मिळते, कार्यकर्ता घडविला जातो.
संघ स्वयंसेवक ते केंद्रीय मंत्री हा माझा प्रवास संघसंस्कार आणि भारतीय जनता पार्टीतील शिदोरीवर घडला आहे, याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. मागे वळून पाहताना माझ्या डोळ्यांसमोर तीस वर्षांचा पट उभा राहतो. सामान्य बूथ कार्यकर्त्यापासून माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. बूथप्रमुख, वॉर्ड अध्यक्ष, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, पुणे शहर संघटन सरचिटणीस, प्रदेश सरचिटणीस अशा असंख्य जबाबदाऱ्या येत गेल्या आणि मी त्या निभावत गेलो. राजकीय क्षेत्रातील वाटचाल अनेक चढ-उतार घेऊन चालावी लागते. अनेकदा निराशा येते. अशा वेळी याच पक्षातील नेतृत्वाने पाठीवर प्रेमाचा हात फिरविला. मनामध्ये पुन्हा नवा आशावाद पेरला. त्यातूनच आज मी येथपर्यंत पोचलो आहे, हा माझा ठाम विश्वास आहे.
माझ्या आयुष्यात मला पक्षात नेत्यांच्या रूपात पालकच लाभले. त्यांनी माझे बोट धरून राजकीय बाराखडी माझ्याकडून गिरवून घेतली. माझ्यातील नेतृत्वगुण विकसित होतील, यादृष्टीने सतत वाव दिला. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी माझ्यातील कार्यकर्त्याचा नेता बनण्याच्या प्रक्रियेला आकार दिला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, माननीय नितीनजी गडकरी, स्वर्गीय गिरीशजी बापट, अनिलराव शिरोळे, रावसाहेब पाटील दानवे, चंद्रकांत(दादा) पाटील, चंद्रशेखर बावनकुळे या व अशा अनेक नेत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला.
मार्ग अधिकाधिक सुकर करीत नेला. त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदरणीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमितभाई शहा यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळण्याइतपत मजल मारू शकलो. आदरणीय मोदीजी आणि अमित शहाजी यांच्यासोबत काम करतानाही आंतरिक जिव्हाळा आणि कार्यकर्ता परिपूर्ण होण्यासाठीचा त्यांचा दृष्टिकोन मी सतत अनुभवतो आहे.
खासदारकीचे वर्ष पूर्ण होत असताना माझ्यावर जिवापाड प्रेम करणारे माझे सर्व सहकारी, पक्षातील मित्र, माझ्यासाठी निरपेक्ष भावनेने काम करणारे सर्व सवंगडी यांचा उल्लेख करावाच लागेल. त्यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे. राजकीय जीवनात सर्वाधिक ताण येतो तो कुटुंबातील सदस्यांवर. गेल्या वर्षभरात मी त्यांच्या वाट्याला काही तासच आलो असेन, परंतु त्यांनी मला समजून घेतले. माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद, माझी पत्नी मोनिका, कन्या, बंधू, कुटुंबातील अन्य सदस्य यांची भक्कम साथ यांमुळेच मी पूर्णपणे झोकून देत काम करू शकलो. या सर्वांविषयी मी कृतज्ञ आहे.
मी महापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष असताना तुम्हा सर्व पुणेकरांचा मला भरघोस पाठिंबा लाभला. तोच अनुभव मी या वर्षभरातही घेतो आहे. याआधी जशी तुम्हाला सोबत घेत काम करण्याची माझी भूमिका होती, त्यात आजही काहीही बदल झालेला नाही. तुमची सोबत आणि साथ हेच माझे भांडवल आहे. देशपातळीवर मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडत असतानाही तुमचे मजबूत पाठबळ माझ्यात अधिक आत्मविश्वास भरते आहे.
पुणेकरांच्या प्रत्येक मताचे मोल मी जाणतो. आपण दिलेले मत सार्थ करण्यासाठी माझा निरंतर प्रयत्न राहील, हा विश्वास या निमित्ताने देतो. समाजव्यापी परमेशाचे, कोटी कोटी रूपे घडते दर्शन, याचा अनुभव मी गेले वर्षभर देशभर फिरत असताना घेतो आहे. या देशाची महती आणि सामर्थ्याची अनुभूती घेतो आहे. देशासाठी आणि पुण्यासाठी काम करण्याचा माझा निश्चय अधिकाधिक दृढ होतो आहे, असेही ते म्हणाले.