घाटात ट्रॅफिक जाम, पेपरला फक्त 15 मिनिटं राहिली पाचगणीच्या पठ्ठयाने थेट डोंगरावरून उडाली मारून दिला पेपर, नेमकं घडलं काय?

पाचगणी : सातारा जिल्ह्यातील पाचगणीत एका विद्यार्थ्यांने एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने परीक्षा दिली आहे. यामुळे त्याची जोरदार चर्चा झाली आहे. हा 19 वर्षीय समर्थ नावाचा तरुण बीकॉमचा विद्यार्थी असून, तो उसाच्या रसाचा गाडाही चावलतो. त्याची पहिल्या सत्रातील परीक्षा नियोजित होती.
प्रत्यक्षात परीक्षा रद्द झाली होती. पण, हॉलतिकीटावर त्याचा तपशील अपडेट न झाल्यानं परीक्षा वेळेआधीच होणार आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही. मित्रांनी फोन करत त्याच्याशी संपर्क साधत ‘आज’ परीक्षा असल्याचं सांगितले. परीक्षेसाठी काही मिनिटं शिल्लक असतानाच त्यानं 15 किमीचं अंतर दूर करण्यासाठी वेगळी वाट निवडली.
पसरणी गावचा समर्थ महांगडे वाईतील किसन वीर महाविद्यालयात आहे. 15 फेब्रुवारीला पेपर होता. मात्र, त्या दिवशी तो कामानिमित्त पाचगणीला गेला. त्यावेळी एका विद्यार्थीनीने त्याला पेपर असल्याची आठवण करून दिली. यामुळे तो गडबडला. साताऱ्यातील वाई इथं असणारा पसरणी घाट ओलांडून परीक्षास्थळी पोहोचण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ तरी गेला असता.
हा वेळ वाचवण्यासाठी समर्थ पॅराग्लायडिंग इंस्ट्रक्टरकडे पोहोचला आणि त्यांच्याकडे मदत मागितली. पुढच्या पाचव्या मिनिटाला हा तरुण अख्खाच्या अख्खा घाट उतरून थेट परीक्षेच्या ठिकाणी पोहोचला होता. यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, तिथं त्याचे मित्र आधीच परीक्षेसाठी लागणारं साहित्य घेऊन हजर होते. अखेर पॅराग्लायडिंग करत तो महाविद्यालयाच्या मैदानावर लँड झाला आणि वर्गाच्या दिशेने गेला. समर्थच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर राडा केला असून, सातारकरांचा नाद करायचा करायचा अशा कमेंट त्यावर येत आहेत.