एकाच वेळी तीन मित्रांनी करून दाखवलं! थेट न्यायाधीश पदाला गवसणी, शिरूर तालुक्यातील तिघांचे होतंय कौतुक…


शिरूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत तीन मित्रांच्या मैत्रीची अनोखी यशोगाथा समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील मित्रांनी एकत्रित पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेल्याने एकच चर्चा सुरु आहे.

ॲड. शुभम कराळे, ॲड. सागर नळकांडे, आणि ॲड. अक्षय ताठे हे शिरूर तालुक्यातील असून या तीन मित्रांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून, तिघांचीही न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. न्यायाधीश होण्याचे एकत्रितपने स्वप्न पाहिलेल्या या तिन्ही मित्रांना एकाच वेळी यश मिळाले आहे.

सविस्तर माहिती अशी की, हे तिन्ही तरुण कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले. ॲड. शुभम कराळे शिक्रापूरचा, ॲड. सागर नळकांडे बुरुंजवाडी गावचा, तर अॅड. अक्षय ताठे कारेगावचा रहिवासी आहे.

तिघांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांतून एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवी (एल.एल.एम.) मिळवली. त्यावेळी एकाच तालुक्यातील या मित्रांची भेट पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात झाली.

दरम्यान, ॲड. सागर नळकांडे आणि अक्षय ताठे हे दिवाणी न्यायालयात वकिली करत होते. तिघेही एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करीत न्यायालयात कार्यरत होते. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी वकिली करताना अनेक गाजलेल्या प्रकरणांमध्ये फिर्यादी व पीडितांना न्याय मिळवून देता आला, असे अॅड. शुभम कराळे यांनी सांगितले आहे.

न्यायाधीश होण्याचे स्वप्न उराशी बाळगून या तिघांची मैत्री अधिक दृढ झाली. वकिली व्यवसाय सांभाळत त्यांनी चार वर्षे नियमित अभ्यास केला. परीक्षा जवळ आल्यावर मोबाईलचा कमीत कमी वापर करून, तसेच वकिलांशी मोजकाच संपर्क ठेवत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

दरम्यान, २०२३ साली एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेसाठी तिघांनी मिळून तयारी केली. ज्येष्ठविधिज्ञ अॅड. गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांनी या परीक्षेसाठीचा अभ्यास केला आणि पूर्व आणि मुख्य परीक्षेत यश मिळवले. नुकत्याच झालेल्या मुलाखतीनंतर जाहीर झालेल्या निकालात ११४ विद्यार्थ्यांची न्यायाधीशपदासाठी निवड झाली असून, त्यामध्ये या तिघांचाही समावेश आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!