राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे दुःखद निधन, 87 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप..

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुविद्य पत्नी सुशीलाताई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन झाले आहे. लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांचे अंत्यसंस्कार सिंदखेड येथे होणार आहेत.
निलंगा तालुक्यातील बामणी धानोरा गावातील शेतकरी अप्पाराव धानुरे यांच्या कन्या असलेल्या सुशीलाताई यांचा विवाह शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासोबत झाला. आपल्या पतीच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी नेहमी खंबीर साथ दिली. त्यांनी देखील अनेक सामाजिक क्षेत्रात काम केले.
त्या प्रेमळ, आदरातिथ्यशील आणि कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून प्रसिद्ध होत्या. सुशीलाताई यांनी घरातील तसेच शेतीच्या जबाबदाऱ्या मोठ्या प्रभावीपणे सांभाळल्या. त्यामुळे डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना सार्वजनिक आणि राजकीय जीवनात मोठे योगदान देता आले. सुशीलाताई निलंगेकर या महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ. शरद पाटील निलंगेकर आणि महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर यांच्या मातोश्री होत्या.
त्यांच्या समर्पणामुळे निलंगेकर कुटुंबाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे स्थान निर्माण केले. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री ८.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
त्या सर्वांना ‘आईसाहेब’ या नावाने ओळखल्या जात होत्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद संभाळत असताना अनेक कामे केली होती.