नेपाळला हादरवणाऱ्या महापुराचा VIDEO पाहून धडकी भरेल! 5200 मीटरवर ग्लेशियर तुटला, 30 मिनिटांत नदी 9 मीटर फुगली; गावं, पूल, रस्ते वाहून गेले


काठमांडू : नेपाळमध्ये अचानक आलेल्या भीषण पुराने मोठ्या प्रमाणात विध्वंस केला आहे. या महापुरामागे नेमकं काय घडलं, याचा थरारक तपशील आता समोर आला आहे. सुरुवातीला या आपत्तीचा संबंध भूकंपाशी जोडला जात होता; मात्र उपग्रह छायाचित्रांच्या प्राथमिक विश्लेषणातून हिमनदीचा मोठा भाग बर्फ आणि दगडांसह कोसळल्याने पुराची लाट निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. या घटनेमुळे इमारती, पूल, रस्ते आणि नदीकाठच्या वस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

लॅंगटांग लिरुंग पर्वताच्या उत्तर उतारावर सुमारे ५२०० मीटर उंचीवर असलेल्या ग्लेशियरचा खालचा भाग तुटला आणि तब्बल १२०० मीटर खाली दरीत कोसळला. बर्फ, दगड आणि मलब्याचा मोठा लोट ल्हेंदे खोला नदीत जाऊन पडला. त्यामुळे नदीचा प्रवाह काही काळ अडला आणि पाण्याचा तात्पुरता साठा तयार झाला. हा अडथळा फुटताच पाणी, चिखल, दगड आणि मलब्याची प्रचंड लाट वेगाने खालीच्या दिशेने धावली.

या पुराचा सर्वाधिक परिणाम नदीच्या प्रवाहातील भागांवर झाला. ल्हेंदे खोला पुढे भोटेकोशी नदीला मिळते. त्यामुळे पुराचा लोट भोटेकोशी नदीत पोहोचला आणि त्यानंतर त्रिशूली नदीपर्यंत त्याचा परिणाम जाणवला. काही ठिकाणी त्रिशूली नदीची पाणीपातळी अवघ्या ३० मिनिटांत ७ ते ९ मीटरने वाढली. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.

दरम्यान, नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने प्लॅनेट लॅब्सच्या उपग्रह छायाचित्रांच्या प्राथमिक विश्लेषणाचा हवाला देत रसुवागढी सीमावर्ती भागापासून सुमारे २० किलोमीटर ईशान्येला बर्फ आणि दगडांचे भूस्खलन झाल्याचे सांगितले आहे. या घटनेतूनच ल्हेंदे नदीत मलब्याने भरलेला महापूर आल्याचे संकेत मिळत आहेत.

मात्र, या आपत्तीच्या कारणावरून वेगवेगळे दावे समोर आले आहेत. नेपाळमधील चीनचे राजदूत झांग माओमिंग यांनी प्राथमिक माहितीनुसार भूकंपानंतर हिमस्खलन आणि त्यानंतर भूस्खलन झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भूकंपाची भूमिका होती का, याबाबत अधिक तपास सुरू आहे. मात्र उपग्रह विश्लेषणात हिम-बर्फ, दगड आणि मलब्याच्या मोठ्या हालचालीला पुराचे प्रमुख कारण मानले जात आहे.

या जलप्रलयात आतापर्यंत मोठी जीवितहानी झाली असून अनेक नागरिक बेपत्ता आहेत. दुर्गम आणि प्रभावित भागांमध्ये बचाव पथके शोधमोहीम राबवत आहेत. या घटनेचे पुरापूर्वी आणि पुरानंतरचे उपग्रह फोटो तसेच व्हिडीओ समोर आल्याने नेपाळमध्ये काही मिनिटांत नेमका किती मोठा विध्वंस झाला, याची कल्पना येत आहे. हिमालयीन भागातील अशा अचानक होणाऱ्या हिमस्खलन आणि भूस्खलनाचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!