अखेर मुहूर्त ठरला! पुणे, ठाणे, नागपूरसह १७ जागांसाठी विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हालचालींना वेग…

मुंबई : राज्यातील पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणुकांची हालचाल वेगाने सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील तब्बल १७ रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून या जागा रिक्त असल्याने विधान परिषदेचे संख्याबळ कमी झाले होते. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर या जागांवरील निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नियमानुसार संबंधित मतदारसंघातील किमान ७५ टक्के मतदार उपलब्ध असल्यास निवडणूक घेता येते. सध्या ही अट पूर्ण होत असल्याने निवडणूक आयोग लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर करू शकतो.

विधान परिषदेतील ७८ सदस्यांपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. त्यापैकी १७ जागा रिक्त असून पुणे, ठाणे, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, नागपूर, संभाजीनगर-जालना, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि धाराशिव-लातूर-बीड या महत्त्वाच्या मतदारसंघांचा यात समावेश आहे.

या निवडणुकांमुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली असून इच्छुक उमेदवारांच्या हालचालींनाही वेग आला आहे.