पवार कुटुंब एकत्र आलं, पण सुनेत्रा पवार गैरहजर! रेवती सुळेंच्या रिसेप्शनमध्ये नेमकं काय घडलं?

पुणे : शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा सारंग लखानी यांच्यासोबत विवाहसोहळा पार पडल्यानंतर दिल्लीमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देशातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, जवळपास संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या दिल्लीतील रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यात सुमारे 20 मिनिटे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासोबत काही वेळ संवाद साधला. पवार कुटुंबातील सदस्यांनीही नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढले.


पवार कुटुंब एकत्र, मात्र सुनेत्रा पवार गैरहजर
रिसेप्शनमध्ये जवळपास संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या. विशेष म्हणजे अजित पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी रिसेप्शनला हजेरी लावली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, सुनेत्रा पवार या रिसेप्शनला का उपस्थित राहिल्या नाहीत, याचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही.
अमित शाह आणि शरद पवार एकाच ठिकाणी
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही बराच वेळ उपस्थित होते. त्यांनी रेवती आणि सारंग यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अमित शाह शरद पवार आणि सुळे कुटुंबीयांसोबत संवाद साधताना दिसले. शरद पवार यांच्या शेजारी अमित शाह बसल्याचे फोटोही समोर आले आहेत.
दरम्यान, राहुल गांधी रिसेप्शनमध्ये उपस्थित असतानाच अमित शाह यांचेही आगमन झाले. अमित शाह नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी मंचावर गेले, त्यावेळी राहुल गांधी खाली उपस्थित होते.
या रिसेप्शनला दिवसभर अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. सुप्रिया सुळे या आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना दिसल्या. त्यामुळे रेवती सुळे यांच्या रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडीओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.