गणपती मंडळात गप्पा मारता मारता अचानक चक्कर; पुणे पोलीस हवालदाराचा हृदयविकाराने दुर्दैवी अंत


पुणे : पुणे शहर पोलीस दलात कर्तव्यनिष्ठ, हुशार आणि धाडसी कर्मचारी म्हणून ओळख असलेले पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे (वय 50) यांचे शुक्रवारी (ता. 25) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले.

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

तेलंगे यांच्या अचानक निधनामुळे पुणे शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

हडपसर येथील रहिवासी असलेल्या तेलंगे यांची वानवडी पोलीस ठाण्यात नेमणूक होती. त्यानंतर त्यांची पोलीस आयुक्त कार्यालयातील सहा विभागात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती.

या ठिकाणी जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला होता. तसेच गोपनीय विभागात काम करताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडल्या होत्या.

गुरुवारी (ता. 24) रात्री काम आटोपून तेलंगे घरी गेले होते. त्यानंतर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ते गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी त्यांना अचानक चक्कर आली. कार्यकर्त्यांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तेलंगे यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्तव्याशी प्रामाणिक, जबाबदार आणि धाडसी सहकारी गमावल्याने पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांच्या निधनाने पोलीस दलातील एक समर्पित सहकारी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!