‘अथर्व गोळी देतोय, त्याला माझ्यासोबत संबंध ठेवायचेत’; बारामतीच्या तरुणीचा आईला शेवटचा फोन, काही तासांतच मृत्यू

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामतीत २३ वर्षीय तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूपूर्वी काही तास आधी तरुणीने आईला फोन करून आपल्यासोबत घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून बारामती शहर पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अथर्व राजेंद्र मेहन (वय २७, रा. गजानन अपार्टमेंट, इंदापूर रोड, बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीने बी.एस्सी. ॲग्रीचे शिक्षण पूर्ण करून पुणे येथे एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती. डिसेंबर २०२५ मध्ये तिचे आणि अथर्वचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आलं होतं. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने १२ एप्रिल २०२६ रोजी दोघांच्या विवाहाचा निर्णयही घेण्यात आला होता.


मात्र, जुलै २०२६ च्या सुमारास तरुणी अचानक शांत-शांत राहू लागली होती. आईने तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली असता, अथर्व हा तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी वारंवार तगादा लावत असून तो तिला काही गोळ्या खाण्यास देत असल्याचं मैत्रिणीनं सांगितलं होतं, असा दावा पीडितेच्या आईनं केला आहे.
६ ऑगस्टचा धक्कादायक घटनाक्रम
६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी अथर्व तरुणीला कारमधून कॉलेजच्या कामासाठी घेऊन गेला. सायंकाळी ७ च्या सुमारास आईने अथर्वच्या फोनवर संपर्क साधला असता तरुणीने आईशी संवाद साधला. त्यावेळी तिने, “अथर्व मला त्याच्या घरी घेऊन जात असून त्याला माझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो मला एक गोळी खाण्यास देणार आहे,” असं सांगितलं. घाबरलेल्या आईने तिला तत्काळ घरी परत येण्यास बजावलं. पण ती आली नाही.
रात्री १० च्या सुमारास अथर्वने तरुणीच्या आईला फोन करून तिला चक्कर आल्याचं सांगितलं आणि तिला तीन वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केलं. शेवटी तो तरुणीला घेऊन सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात घेऊन आला. मात्र इथं पोहचण्यापूर्वीच या तरुणीचा मृत्यू झाला होता. घरात शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तिला अचानक चक्कर आली आणि यातच तिचा मृत्यू झाल्याचा दावा अथर्वने केला.
तरुणीला प्रत्यक्षात कोणती गोळी किंवा औषध देण्यात आलं होतं का? त्याचा तिच्या शरीरावर काय परिणाम झाला आणि तिच्या मृत्यूशी या औषधाचा थेट संबंध आहे का, याचा शोध आता बारामती शहर पोलीस घेत आहेत. विशेष म्हणजे दोघांचं लग्न ठरलेलं असताना होणाऱ्या पतीकडूनच अशाप्रकारे गोळ्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.