‘फडणवीसांनी डोळे वटारले तर साम्राज्य उद्ध्वस्त होईल’ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना सतेज पाटलांचा इशारा; थेट २०२९ च्या लढाईचीच दिली हाक!

कोल्हापूर : ‘उद्ध्वस्त करतो, बघून घेतो’ अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मीसुद्धा पाटील आहे,’ असे म्हणत त्यांनी सत्तेच्या जोरावर दहशत निर्माण करण्याच्या राजकारणाला आव्हान दिले. विशेष म्हणजे, केवळ विधानाला उत्तर देऊन न थांबता सतेज पाटील यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत लढण्याचे खुले आव्हान दिले. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात नव्या संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोळे वटारले, तर सतेज पाटील यांचे राजकीय साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या विधानावरून दोन्ही नेत्यांमधील जुना संघर्ष पुन्हा चर्चेत आला. त्यावर प्रतिक्रिया देताना सतेज पाटील यांनी सरकारी पदाचा किंवा सत्तेचा वापर करून धमकावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा दिला. कोल्हापूरकर आणि महाराष्ट्रातील जनता दबावाचे राजकारण स्वीकारणार नाही, असेही त्यांनी सुनावले.
‘बंटीचा बंटी साहेब झाला नाही’ या टिप्पणीवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. लोकांच्या मनात साहेब म्हणून नव्हे, तर बंटी पाटील म्हणूनच राहायचे आहे, असे ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांची राजकीय उंची वाढत असताना वैचारिक पातळी घसरत असल्याची टीकाही त्यांनी केली. गेल्या दहा वर्षांपासून दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरू असल्याचे सांगत या वादात दिवंगत डॉ. डी. वाय. पाटील यांच्याबाबत वक्तव्य करण्याची गरज काय होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

२०२९ मध्ये दहा मतदारसंघांत आमनेसामने येण्याचे आव्हान!

सतेज पाटील यांनी पुढील विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांना थेट मैदानात उतरण्याचे आव्हान दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत एकमेकांविरोधात लढूया आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर विजय मिळवून दाखवूया, असे ते म्हणाले. सत्तेच्या दबावापेक्षा जनतेचा कौल महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
गोकुळच्या राजकारणावरून मुश्रीफांनाही टोला
या राजकीय वादात सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरही निशाणा साधला. २०१४ मध्ये उमेश आपटे यांनी केलेल्या मदतीची आठवण ठेवावी, असा टोला त्यांनी लगावला. शासकीय यंत्रणा आणि व्यवस्थेचा वापर कसा करता येतो, हे मुश्रीफ यांनी दाखवून दिल्याचा आरोप त्यांनी केला. वटहुकूमाच्या माध्यमातून कोणत्याही संस्थेची सत्ता हस्तगत करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, त्यामुळे अशा निर्णयांना आपला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे कामे घेऊन जाण्याऐवजी राहुल गांधी यांच्याकडून कामे करून घ्यावीत, अशी टीका केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिक्षणमंत्री म्हणून आदेश दिल्यास सतेज पाटील यांचे काहीही शिल्लक राहणार नाही, असेही ते म्हणाले होते. आता या विधानाला सतेज पाटील यांनी दिलेले प्रत्युत्तर आणि २०२९ च्या निवडणुकीचे आव्हान यामुळे कोल्हापूरमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
