जेवणाचं बिल भरलं, पण हॉटेलमध्ये पेटला वादाचा भडका! लोणीकाळभोरमध्ये माजी सरपंचासह चौघांचा धुडगूस; तक्रार देऊन परतणाऱ्या तरुणांनाही रस्त्यात गाठलं!

लोणी काळभोर : जेवणाचे ऑनलाइन पैसे भरल्यानंतर बिलाबाबत झालेली विचारणा आणि त्यातून सुरू झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना कदमवाकवस्ती येथील जगदंबा हॉटेलमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे, हॉटेलमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या मालकाच्या मुलालाही परतताना रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात लोणी काळभोरचे माजी सरपंच राहुल काळभोर यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

कदमवाकवस्ती येथील एंजल हायस्कूलजवळ राजेंद्र यदू चौधरी (वय ५६, रा. लोणी काळभोर) यांचे गेल्या ३० वर्षांपासून जगदंबा हॉटेल सुरू आहे. ९ नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी ऑनलाइन पद्धतीने बिलाचे पैसे भरले. त्यानंतर बिल मिळाल्याबाबत विचारणा झाली. हॉटेल मालकाने बिल मिळाल्याचे सांगितले; मात्र याच कारणावरून रामभाऊ यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप चौधरी यांनी तक्रारीत केला आहे.
हा वाद सुरू असताना मालकाचा मुलगा मयूर चौधरी याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मयूरने रामभाऊ यांना हॉटेलबाहेर काढल्यानंतर काही वेळाने त्यांचे भाऊ आणि लोणी काळभोरचे माजी सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर हॉटेलमध्ये आले. त्यांनीही शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप आहे.

मात्र, त्यानंतर घडलेल्या प्रकाराने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. मयूर चौधरी तक्रार नोंदवण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेले होते. ते पोलीस ठाण्यात पोहोचून अवघी १० ते १५ मिनिटे झाली असताना राहुल काळभोर, रामभाऊ काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर पुन्हा हॉटेलमध्ये आल्याचा आरोप आहे. त्यांनी हॉटेल मालक, त्यांचा मुलगा, कामगार आणि तेथे जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित असलेले ग्राहक दीपक रमेश कुकरेजा यांनी चौघांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र, त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. हॉटेलमधील कामगाराने मयूरला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मयूर आणि त्याचा चुलत भाऊ ओम चौधरी पोलीस ठाण्यातून हॉटेलकडे परतत होते. त्याचवेळी हॉटेलजवळील डॉमिनोज पिझ्झासमोर त्यांना अडवण्यात आले. तेथेही चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी राहुल दत्तात्रय काळभोर, रामचंद्र ऊर्फ रामभाऊ काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर (सर्व रा. लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. हॉटेल मालक राजेंद्र चौधरी यांच्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(४), ११८(१), ३३२(क), ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. एका बिलावरून सुरू झालेला वाद हॉटेलमधील अनेकांना मारहाण आणि रस्त्यात अडवण्यापर्यंत पोहोचल्याने कदमवाकवस्ती परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.
