३० हजार शिक्षक भरतीत मोठा ट्विस्ट! ‘पवित्र’ पोर्टलवर नवे नियम; ‘ही’ चूक केली तर उमेदवारी होणार रद्द


पुणे : राज्यात सध्या सुमारे ३० हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेत आता महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी ‘पवित्र’ पोर्टलमध्ये काही नवे नियम समाविष्ट करण्यात आले आहेत.

त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरताना आणि पदांचा प्राधान्यक्रम निवडताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे, नव्या नियमांमुळे संस्थाचालकांचीही धाकधूक वाढली आहे.

‘एकास एक’ आणि ‘एकास तीन’ प्रमाण लागू

‘पवित्र’ पोर्टलच्या नव्या नियमांनुसार, मुलाखतीशिवाय होणाऱ्या पहिल्या फेरीसाठी १:१, तर मुलाखतीसह होणाऱ्या प्रक्रियेसाठी १:३ हे प्रमाण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे गुणवंत उमेदवारांना अधिक थेट संधी मिळणार असून, भरती प्रक्रियेत मनमानीला आळा बसण्याची शक्यता आहे.

एकदा निवड झाली तर पुन्हा संधी नाही

नव्या नियमांमधील महत्त्वाचा बदल म्हणजे, प्राधान्यक्रमाच्या आधारे एखाद्या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याच TAIT परीक्षेच्या गुणांवर दुसऱ्या पदासाठी पुन्हा संधी मिळणार नाही. उमेदवाराला पुन्हा भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल.

त्यामुळे उपलब्ध पदांचा प्राधान्यक्रम निवडताना उमेदवारांना अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे.

जास्तीत जास्त १०० प्राधान्यक्रम निवडता येणार

उमेदवारांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार ‘पवित्र’ पोर्टलवर प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. मुलाखतीशिवाय होणाऱ्या प्रक्रियेत उमेदवारांना जास्तीत जास्त १०० प्राधान्यक्रम, तर मुलाखतीसह प्रक्रियेत जास्तीत जास्त ५० प्राधान्यक्रम निवडता येणार आहेत.

स्व-प्रमाणपत्रातील माहितीच्या आधारे प्रक्रिया होणार असल्याने अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यास उमेदवाराचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पात्रता, विषय, इयत्ता, आरक्षण आणि उपलब्ध पदांची माहिती तपासल्यानंतरच प्राधान्यक्रम लॉक करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संस्थाचालकांच्या मनमानीला बसणार चाप?

मुलाखतीसह होणाऱ्या प्रक्रियेत १:३ प्रमाण निश्चित करण्यात आल्याने प्रत्येक पदासाठी मुलाखतीसाठी केवळ तीन उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे संस्थाचालकांना उपलब्ध उमेदवारांमधूनच निवड करावी लागणार आहे.

तर मुलाखतीशिवाय होणाऱ्या प्रक्रियेत १:१ प्रमाण असल्याने गुणवत्तेच्या आधारे थेट नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे.

पात्रतेच्या तारखाही महत्त्वाच्या

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता १४ मेपर्यंत, तर व्यावसायिक अर्हता २५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.

जाहिरातीतील आरक्षण, इयत्तानिहाय गट आणि विषयानुसार उपलब्ध रिक्त पदांची माहिती उमेदवारांच्या लॉगिनवर देण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपली पात्रता आणि उपलब्ध पदांची माहिती तपासूनच प्राधान्यक्रम निश्चित करणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!