सस्पेन्स संपला! नवी मुंबई विमानतळावरून पहिलं आंतरराष्ट्रीय उड्डाण कधी होणार? तारीख आली समोर..

मुंबई : मुंबई आणि परिसरातील प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी सेवेसाठी सज्ज झाला असून, आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच मालवाहतूक (कार्गो) विमानसेवाही सुरू होणार असल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला नवे बळ मिळणार आहे.

विमानतळावरील बहुतांश कामे पूर्णत्वास पोहोचली असून, उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी अंतिम तयारी वेगाने सुरू आहे. विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रवासी आणि कार्गो या दोन्ही सेवा एकाच टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारततुला शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलैपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांना सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक विमानसेवाही सुरू केली जाणार आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगो या विमान कंपन्या येथून आंतरराष्ट्रीय सेवा देणार आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना परदेश प्रवासासाठी मोठा पर्याय उपलब्ध होणार असून, विद्यमान विमानतळावरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. या विमानतळामुळे प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
