अपघाताची बातमी ऐकताच मदतीसाठी धावले, पण परतलेच नाहीत! लेकीच्या हॉटेलचं स्वप्न राहिलं अधुरं; एएसआय संतोष गायकवाड यांचा काळजाचा ठोका चुकवणारा अंत

रत्नागिरी : दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभावच अखेर त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला. महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच कर्तव्य बजावण्यासाठी निघालेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष आप्पासाहेब गायकवाड यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ शनिवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. कंटेनरने पोलिसांच्या बोलेरोला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने दरीत कोसळली. या दुर्घटनेत कंटेनरचालक आणि क्लीनरचाही मृत्यू झाला, तर एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड यांना महामार्गावर अपघात झाल्याचा दूरध्वनी आला होता. मदतीसाठी ते घटनास्थळी जात असताना अंजणारी पुलाजवळ हा अपघात झाला. महामार्गावरील अवघड वळण आणि उताराच्या ठिकाणी भरधाव कंटेनरने त्यांच्या बोलेरोला मागून धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहने रस्त्याशेजारील दरीत कोसळली. या घटनेने रत्नागिरी परिसरात शोककळा पसरली आहे.
मुलगा अभियंता झाला, मुलीसाठी हॉटेल सुरू करण्याची तयारी; पण स्वप्न अपूर्ण!

संतोष गायकवाड यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधार हरपला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. मुलाने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे, तर मुलीने हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले होते. मुलीला हॉटेल व्यवसायाची आवड असल्याने तिच्यासाठी स्वतःचे हॉटेल सुरू करून देण्याचे गायकवाड यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते. मात्र, लेकीच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्याआधीच त्यांची साथ कायमची सुटली.

पोलीस सेवेला ३० वर्षे पूर्ण होण्याआधीच काळाचा घाला
गायकवाड यांनी १९९५-९६ च्या सुमारास महाराष्ट्र पोलीस दलात सेवा सुरू केली होती. येत्या ३० नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांच्या सेवेला ३० वर्षे पूर्ण होणार होती. पुढील दोन ते तीन वर्षांत पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळण्याची शक्यताही होती. त्यांचे वडीलही पोलीस खात्यात कार्यरत होते आणि काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले. मात्र, ते सध्या आजारपणामुळे त्रस्त असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
गायकवाड कुटुंबाचे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे गावचे आहे. धरणामुळे काही गावकऱ्यांचे सावर्डेजवळील नायशी येथे पुनर्वसन झाले होते. संतोष गायकवाड हे रत्नागिरीजवळील खेडशी येथे स्थायिक झाले होते. मनमिळाऊ आणि मदतशील स्वभावामुळे ते मित्रपरिवारात लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह सहकारी आणि मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. रविवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्य बजावताना आणि दुसऱ्याच्या मदतीसाठी जाताना त्यांचा झालेला मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेला.
