एकाच धमकीच्या ई-मेलने राज्यातील न्यायालयांमध्ये खळबळ! ठाणे ते बीडपर्यंत कोर्ट रिकामी; २७ नोव्हेंबरचा उल्लेख, महालक्ष्मी रेसकोर्सलाही बॉम्बस्फोटाचा इशारा?

मुंबई : न्यायालयांच्या इमारतींमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा करणारे धमकीचे ई-मेल मिळाल्याने सोमवारी (२ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली. ठाणे, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली आणि बीडसह विविध जिल्ह्यांतील न्यायालयांना धमकीचे संदेश प्राप्त झाल्याची माहिती आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन न्यायालयीन इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या. न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बॉम्बशोधक व नाशक पथकांसह श्वान पथकांनी परिसराची तपासणी सुरू केली.

ठाणे जिल्हा न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी पंजाबी भाषेतील संदेश आला. त्यात दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी आयईडी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती. २७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात स्फोट घडवण्याचा उल्लेखही करण्यात आला. याशिवाय रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी मेट्रो स्थानकांवर स्फोट करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती आहे.
या ई-मेलमध्ये १९८४ मधील रक्तपाताचा बदला घेण्याचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच २७ नोव्हेंबरला महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमात आयफोनमध्ये आयईडी ठेवून स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. संदेशात मराठी बांधवांना उद्देशून त्यांच्या मुलांच्या सुरक्षेबाबतही धमकीवजा मजकूर होता.

धमकी मिळताच ठाणे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी दोन्ही न्यायालयीन इमारती रिकाम्या करून नागरिकांना सुमारे १०० मीटर अंतरावरील सुरक्षित ठिकाणी हलवले. आठ मजली इमारती, वाहनतळ, उपाहारगृह आणि संपूर्ण परिसराची तपासणी सुरू करण्यात आली. गुन्हे शाखा आणि सायबर पथकही तपासात सहभागी झाले.

सांगली जिल्हा सत्र न्यायालयालाही बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल मिळाल्यानंतर न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना बाहेर काढण्यात आले. बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाने तपासणी केली. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातही धमकीचा संदेश मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आणि संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला.
परभणी आणि हिंगोलीमध्येही पोलिसांनी तातडीने सुरक्षा व्यवस्था वाढवली. हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर सकाळी ११ वाजता धमकीचा संदेश आल्याची माहिती आहे. तेथेही बॉम्बशोधक पथक, श्वान पथक, शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपासणीसाठी दाखल झाले. बीड जिल्हा सत्र न्यायालयात धमकीचा ई-मेल मिळताच न्यायालयाची इमारत रिकामी करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.
ई-मेलमागचा सूत्रधार कोण?
या धमकीच्या संदेशांमागे नेमका कोण आहे, ई-मेल कुठून पाठवण्यात आले आणि त्यात नमूद केलेल्या धमक्यांमध्ये तथ्य आहे का, याचा शोध सायबर पोलीस घेत आहेत. न्यायालयांचे कामकाज लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी आणि तपास सुरू असलेल्या न्यायालयीन परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तपासणीत स्फोटक आढळल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
