ना OTP दिला, ना लिंकवर क्लिक केलं; तरी ७४ वर्षीय आजोबांच्या खात्यातून ७.३० लाख गायब, नेमकं काय घडलं?


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ना कोणाला OTP सांगितला, ना कोणत्याही लिंकवर बँकेची माहिती भरली, तरीही एका ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ३० हजार ४६३ रुपये गायब झाले आहेत. मोबाइलचा रिमोट ॲक्सेस मिळवून सायबर चोरट्यांनी दोन बँक खाती आणि क्रेडिट कार्डवरून परस्पर व्यवहार केल्याचा संशय आहे.

रात्री काही तासांत खात्यातून लाखोंची रक्कम गायब

दिलीपकुमार बिश्वनाथ घोष असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते ११ वाजून ५० मिनिटांच्या दरम्यान त्यांच्या बँक खात्यांमधून आणि क्रेडिट कार्डवरून एकापाठोपाठ आर्थिक व्यवहार करण्यात आले. या व्यवहारांतून एकूण ७ लाख ३० हजार ४६३ रुपये वळते करण्यात आले.

दोन बँक खाती आणि क्रेडिट कार्डवर डल्ला

सायबर चोरट्यांनी घोष यांच्या ICICI बँक खात्यातून १ लाख ८३ हजार रुपये, तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ४८ हजार रुपये काढले. याशिवाय त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ४ लाख ९९ हजार रुपयांचे व्यवहार करण्यात आले. अशा प्रकारे एकाच वेळी दोन बँक खाती आणि क्रेडिट कार्डमधून मोठी रक्कम लंपास करण्यात आली.

विशेष म्हणजे, पीडित नागरिकाने कोणालाही OTP दिल्याचे किंवा अनोळखी लिंकवर बँकेची माहिती भरल्याचे समोर आलेले नाही. मोबाइलचा रिमोट ॲक्सेस मिळवून चोरट्यांनी हे व्यवहार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच पैसे वळते झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमधील सातारा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइलचा रिमोट ॲक्सेस नेमका कसा मिळवण्यात आला आणि फसवणुकीची रक्कम कुठे वळवण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.

मोबाइलचा रिमोट ॲक्सेस देताना सावध राहा!

सायबर चोरटे आता फसवणुकीसाठी नवनवीन पद्धतींचा वापर करत आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणतेही रिमोट ॲक्सेस ॲप डाउनलोड करू नका. तसेच अनोळखी व्यक्तीला स्क्रीन शेअरिंग किंवा मोबाइल नियंत्रणाची परवानगी देऊ नका. बँक किंवा सरकारी विभागाच्या नावाने फोन आल्यास संबंधित व्यक्तीची अधिकृत खातरजमा केल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया करू नका.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!