‘मी फक्त काही क्षण दूर गेलो अन् ती मृतावस्थेत सापडली!’ प्रियकराचा बनाव पोलिसांनी उघड केला; जंगलातील तरुणीच्या मृत्यूमागचं धक्कादायक सत्य समोर


बालाघाट : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील जंगल परिसरात एका २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर निर्माण झालेल्या गूढाचा रामपायली पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत उलगडा केला आहे. सुरुवातीला प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा करणाऱ्या तिच्या प्रियकरालाच पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली अटक केली. विशेष म्हणजे, मृतदेहाजवळ बसून राहिलेल्या प्रियकराने पोलिसांसमोर सांगितलेली कहाणी आणि शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या बाबींमध्ये तफावत आढळली.

मृत तरुणीचे नाव साक्षी डोहरे असून आरोपी आकाश वाघमारे असे आहे. दोघेही एका खासगी रुग्णालयात काम करत होते. आकाश तेथे वॉर्ड बॉय म्हणून, तर साक्षी परिचारिका म्हणून कार्यरत होती. गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, साक्षी लग्नासाठी तयार नसल्याने त्यांच्यात वाद होत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

२९ ऑक्टोबर रोजी साक्षी आणि आकाश रुग्णालयातून बाहेर पडले. मात्र, दोघेही घरी परतले नाहीत. त्याच रात्री रामपायली पोलिसांना बोदलकसा आणि बन्सी गावादरम्यानच्या जंगल मार्गावर एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा साक्षीचा मृतदेह तेथे होता आणि आकाश त्याच्याजवळ बसलेला होता. गोरेघाट येथील आकाश आणि लिंगमारा येथील साक्षी यांच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती मिळाली होती.

‘मी लघुशंकेसाठी गेलो अन् ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली’

पोलिसांसमोर आकाशने वेगळीच कहाणी सांगितली. आपण साक्षीला दुचाकीजवळ थांबवून काही अंतरावर लघुशंकेसाठी गेलो होतो. परत आल्यानंतर ती ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली, असा त्याचा दावा होता. त्यानंतर तिला खाली उतरवून कृत्रिम श्वसन देण्याचाही प्रयत्न केला; मात्र तिचा जीव वाचू शकला नाही, असे त्याने सांगितले. त्याच्या या जबाबामुळे सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला.

मात्र, पोलिसांनी केवळ आरोपीच्या कथनावर विश्वास न ठेवता मृतदेहाची वैद्यकीय तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेला. शवविच्छेदन अहवालात संशयास्पद बाबी समोर आल्यानंतर तपासाची दिशा बदलली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शर्मा यांच्या माहितीनुसार, आकाशची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने साक्षीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

लग्नास नकार दिल्याने टोकाचे पाऊल?

पोलिसांच्या माहितीनुसार, आकाशने साक्षीकडे लग्नाचा आग्रह धरला होता. मात्र, तिने लग्नास नकार दिल्याने तो संतप्त झाला आणि त्यातूनच त्याने तिचा गळा आवळल्याचा आरोप आहे. हत्येनंतर ही घटना आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचा संशयही तपासात व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी रामपायली पोलिसांनी आकाश वाघमारे याला अटक करून न्यायालयात हजर केले आहे. दोन वर्षांच्या प्रेमसंबंधांचा शेवट इतक्या भीषण घटनेत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुरुवातीला आत्महत्येचा दावा करणाऱ्या प्रियकराच्या कथित बनावाचा तपासातून उलगडा झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!