शरद पवारांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला अचानक ब्रेक! ऐनवेळी दौरा स्थगित करण्याचा निर्णय, नेमकं कारण काय?

पुणे : राज्यात अपुऱ्या पावसामुळे अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अन्नधान्य आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते.
रविवारी (१ नोव्हेंबर) सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून या दौऱ्याला सुरुवात झाली. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी शरद पवार करमाळा, बार्शी आणि धाराशिव जिल्ह्यातील परांडा या भागांना भेट देणार होते. या दौऱ्यात ते शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार होते.

मात्र, ऐनवेळी शरद पवार यांचा आजचा दुष्काळ पाहणी दौरा स्थगित करण्यात आला आहे. हवामानातील बदल आणि पावसाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, बारामतीसह पुणे जिल्ह्यात मागील काही तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. बदललेली हवामान परिस्थिती आणि सुरक्षेच्या कारणास्तव पवार यांचा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. या दौऱ्याची नवीन तारीख आणि वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
माढ्यातील तुळशी गावाला ५० लाखांची मदत
दरम्यान, रविवारी शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गावाला भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी गावाच्या मदतीसाठी त्यांनी ५० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला.
आता शरद पवार यांच्या पुढील दुष्काळ पाहणी दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक कधी जाहीर होणार, याकडे शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
