पुण्यात दिवाळीपूर्वीच चोरट्यांचा धुमाकूळ; महिन्याभरात ४७ घरफोड्या, एक कोटींचा ऐवज लंपास

पुणे : सण-उत्सवांचा काळ सुरू असतानाच पुणे शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्याभरात शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल ४७ घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. विशेष म्हणजे, घरांबरोबरच दुकानेही चोरट्यांच्या निशाण्यावर आली आहेत.

दिवाळीच्या काळात बंद घरांना लक्ष्य
दिवाळीचा सण जवळ आल्याने अनेक नागरिक पर्यटनासाठी बाहेरगावी जाण्याचे, तसेच गावी जाऊन सण साजरा करण्याचे नियोजन करत आहेत. त्यामुळे अनेक घरे काही दिवस बंद राहणार आहेत. याच संधीचा फायदा घेत चोरटे बंद घरांना लक्ष्य करत असल्याचे चित्र आहे. दसऱ्यापासून आंबेगाव, विश्रांतवाडी, समर्थ, लोणी काळभोर, लोहगाव, मांजरी, कोथरूड आणि खराडी यांसह विविध भागांत घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.

दुकानेही चोरट्यांच्या निशाण्यावर

घरफोड्यांसोबतच दुकानफोडीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मार्केट यार्ड परिसरातील दोन दुकाने फोडून सहा लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. तर वानवडी येथे दुकानाचे शटर उचकटून सहा लाख ७७ हजार ५०० रुपयांची चोरी करण्यात आली. याशिवाय काळेपडळ, चंदननगर, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, लोहगाव आणि वाघोली परिसरातही दुकानफोडीच्या घटना घडल्या आहेत.
भरदिवसा घरफोड्या; नागरिकांमध्ये चिंता
गेल्या महिन्याभरात शहरात भरदिवसा घरफोडीच्या सात घटना घडल्या आहेत. लोणी काळभोर येथे दिवसाढवळ्या चार लाख आठ हजार ४३८ रुपयांची चोरी झाली. आंबेगाव येथे अवघ्या तासाभरात घरफोडी करण्यात आली. समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही दुपारी चोरीची घटना घडली. खडक, फुरसुंगी आणि चतु:शृंगी परिसरातही भरदिवसा घरफोड्या झाल्या आहेत. सिंहगड रस्ता परिसरात सायंकाळच्या वेळेत घरफोडी करण्यात आली.
विश्रांतवाडीत सर्वाधिक घरफोड्या
पोलिसांच्या आकडेवारीनुसार, महिन्याभरात विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक चार घरफोड्या झाल्या आहेत. आंबेगाव, समर्थ, लोणी काळभोर आणि लोहगाव परिसरात प्रत्येकी तीन घटना घडल्या आहेत. मांजरी येथे दोन घरफोड्यांमध्ये आठ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. लोहगावमधील संतनगर भागात घराचे कुलूप तोडून सात लाख ६४ हजार रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. तर वाघोली येथे एका घरफोडीत सुमारे नऊ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत.
दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी घराच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
