फॉर्च्युनरची बुकिंग, विमानाची तिकिटे अन् अचानक फोन बंद! कुंजीरवाडीच्या शेतकऱ्याला साडेआठ लाखांचा गंडा


लोणी काळभोर : टोयोटा फॉर्च्युनर लेजेंडर ही आलिशान गाडी खरेदी करण्याचे स्वप्न हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. मुंबईतील एका भामट्याने ऑनलाईन व्यवहाराचा बहाणा करत या शेतकऱ्याची तब्बल ८ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुंजीरवाडी येथील रहिवासी विक्रम रमेश धुमाळ (वय ४२) आणि त्यांच्या पत्नी तेजल यांनी जुलै २०२६ मध्ये फॉर्च्युनर लेजेंडर गाडी खरेदी करण्यासाठी ऑनलाईन शोध घेतला होता. यादरम्यान त्यांचा संपर्क मुंबईतील मुलुंड येथील ‘ॲपेक्स ऑटो हब’शी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या प्रसन्ना हरिश्चंद्र सावंत नावाच्या व्यक्तीशी आला. सावंत याने गाडीची किंमत ५१ लाख १० हजार रुपये सांगून व्यवहार पक्का केला.

विश्वास संपादन करून सावंत याने धुमाळ यांच्याकडून गाडी बुकिंग, विमा आणि आरटीओ रजिस्ट्रेशनच्या नावाखाली वेगवेगळ्या टप्प्यांत लाखो रुपये ऑनलाईन आणि आरटीजीएसद्वारे स्वतःच्या खात्यावर व शोरूमच्या नावावर ट्रान्सफर करून घेतले.

गाडी कोईम्बतूर येथे असल्याचे सांगून संशयित आरोपी सावंत याने १७ जुलै रोजी धुमाळ, त्यांच्या भावाचे आणि स्वतःचे विमानाचे तिकीट बुक करून पाठवले. मात्र, प्रत्यक्ष प्रवासाची वेळ आली तेव्हा सावंत याने फोन उचलणे बंद केले. संशय आल्याने धुमाळ यांनी थेट कोईम्बतूरच्या शोरूमशी संपर्क साधला. तेव्हा सावंत याने त्यांची फसवणूक केल्याचे आणि गाडीचे बुकिंग चाकण येथील एका एजन्सीमार्फत झाल्याचे उघड झाले. तसेच शोरूमचे पैसे थकवल्याचेही समोर आले.

धुमाळ यांनी चाकण येथील विक्रेत्याशी संपर्क साधून उर्वरित प्रक्रिया पूर्ण केली आणि ११ ऑगस्ट रोजी गाडी ताब्यात घेतली. मात्र, सावंत याने घेतलेल्या रक्कमेपैकी केवळ १ लाख रुपये परत केले आणि उर्वरित साडेआठ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विक्रम धुमाळ यांनी लोणी काळभोर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी संशयित आरोपी प्रसन्ना सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या सायबर फसवणुकीचा पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!