‘दिवाळीला माहेरून सोनं आण…’ सासरच्या मंडळींचा तगादा; पुण्यातील नामांकित कुटुंबातील IT इंजिनिअर सुनेची आत्महत्या, परिसरात खळबळ

पुणे : पुण्यातील मुकुंदनगर परिसरात २९ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पायल अक्षय झांबरे असे मृत महिलेचे नाव आहे. सासरच्या मंडळींकडून हुंडा आणि सोन्याच्या मागणीसाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूच्या कारणाचा सखोल तपास करण्याची मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे.

मुकुंदनगरमध्ये विवाहितेचा मृत्यू
मुकुंदनगर येथील अक्षय हाइट्स सोसायटीमधील एका जुन्या फ्लॅटमध्ये सोमवारी पायल यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पायल एका आयटी कंपनीत नोकरी करत होत्या. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांचा अक्षय झांबरे यांच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला चार वर्षांची मुलगी आहे.

घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची तपासणी करण्यात आली असून, फॉरेन्सिक पथकानेही आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. तसेच सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

दिवाळीत सोन्याची मागणी केल्याचा आरोप
या प्रकरणात पायल यांचे चुलत भाऊ जनार्दन पवार यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीच्या सणाच्या काळात दरवर्षी पाच ते दहा तोळे सोन्याची मागणी केली जात होती. यंदा माहेरच्या कुटुंबीयांनी ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवली होती. तसेच पुढील वर्षापर्यंत थांबण्याची विनंती केली होती.
मात्र, त्यानंतरही पायल यांच्यावर दबाव टाकण्यात आला आणि त्यांचा मानसिक व शारीरिक छळ सुरूच होता, असा आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पायल यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी स्वारगेट पोलीस तपास करत आहेत. पोलिस तपासानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे.
