शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! अचानक तब्येत बिघडली, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे. रुग्णालयात त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत.

दुष्काळी पाहणी दौऱ्यानंतर प्रकृतीत बिघाड

शरद पवार यांनी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव आणि पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली होती. या दौऱ्यात त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.

प्रकृती अस्वस्थ असल्याने दौरा रद्द?

दरम्यान, आज नियोजित असलेला शरद पवार यांचा दुष्काळी पाहणी दौरा अचानक रद्द करण्यात आला. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे दौरा रद्द केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानेच दौरा रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. सोलापूर दौऱ्यानंतर ते पुण्यात परतले होते. त्यानंतर कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिवाळीनंतर करमाळ्यात दुष्काळी पाहणी

दरम्यान, दिवाळीनंतर शरद पवार करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. बारामती आणि भिगवण परिसरात झालेल्या पावसामुळे नियोजित दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी दिली होती. आपण पवार यांची भेट घेतल्यानंतरच करमाळ्याला गेलो होतो आणि दौऱ्याची तयारी सुरू होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पुढील वैद्यकीय तपासण्या आणि डॉक्टरांच्या निरीक्षणानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!