धंगेकरांचा संयम सुटला तर राजकारणात मोठा भूकंप? प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांना थेट इशारा; ‘दरवाजाबाहेर का उभं केलं होतं, तेही सांगीन!’


पुणे : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेत सुरू झालेला वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. भाजपच्या पराभवावरून सुरू झालेल्या आरोपांच्या फैरींमध्ये रवींद्र धंगेकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनाच लक्ष्य केले आहे. जुन्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी दोघांनाही जपून बोलण्याचा इशारा दिला. ‘माझं तोंड उघडलं तर सगळं उद्ध्वस्त होईल,’ या त्यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना आणखी धार आली आहे.

विधान परिषद निवडणुकीत भाजपला पदवीधर मतदारसंघातील तिन्ही जागा गमवाव्या लागल्या. या पराभवानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत शिंदे यांच्या शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली होती. पुणे आणि नागपूरमध्ये शिवसेनेकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्यामुळे भाजपला फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी बन यांच्यावर जोरदार टीका केली. बन यांनीही प्रत्युत्तर दिल्याने भाजप-शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला.

याच राजकीय संघर्षात धंगेकर यांनी आता प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. दोघांनाही आपण पूर्वीपासून ओळखत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या मनसेतील जुन्या प्रवासाचा संदर्भ दिला. “त्यांना मनसे का सोडावी लागली, त्यांना दरवाजाबाहेर का उभे केले होते, हे मी कधीतरी सांगेन. शेवटी त्यांना पळून जावे लागले,” असे धंगेकर म्हणाले. या वक्तव्यामुळे त्यांनी नेमक्या कोणत्या घटनेचा उल्लेख केला, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘अंगलट येईल असं बोलू नका’; भेट घेण्याचाही दावा

प्रसाद लाड यांच्याशी आपली मैत्री असल्याचे सांगत धंगेकर यांनी या आठवड्यात त्यांची भेट घेणार असल्याचे म्हटले. मात्र, आपल्याबाबत बोलताना मर्यादा पाळण्याचा इशाराही दिला. “त्यांनी लाचारीच्या पद्धतीने पदे मिळवली. प्रसाद लाड उद्योगासाठी आले. अंगलट येईल असे बोलू नका. माझे तोंड शांत आहे; पण एकदा उघडले तर सगळे उद्ध्वस्त होईल,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आपल्या पक्षप्रवेशांवर होणाऱ्या टीकेलाही धंगेकर यांनी उत्तर दिले. आपण स्वार्थासाठी पक्ष बदलले नाहीत किंवा पदे मिळवली नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. “मी शिंपी गल्लीत राहतो. सगळ्यांचे मोजमाप माझ्याकडे आहे,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. काही जण आपल्यावर बारा पक्ष फिरल्याची टीका करतात; मग त्यांनी चौदा पक्षांशी केलेल्या युतीचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिंदेंचा सल्ला म्हणून शांत; पण ‘सातबारा’ अजून बाकी!

आपण सध्या शांत का आहोत, याचे कारणही धंगेकर यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी शांत राहून दुष्काळाच्या प्रश्नावर काम करण्याची सूचना केल्यामुळे आपण संयम बाळगत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, “बाकीचा सातबारा माझ्याकडे आहे,” असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा सूचक इशारा दिला.

निवडणुकीतील पराभवावरून सुरू झालेला वाद आता जुन्या राजकीय संबंधांपर्यंत पोहोचला आहे. धंगेकर यांनी उल्लेख केलेल्या मनसेतील प्रसंगांबाबत ते नेमके काय उघड करणार? प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर या आरोपांना काय उत्तर देणार? याकडे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!