राज्यात अवकाळी पावसासोबत वीज पडण्याचा धोका वाढतोय! अशी करा उपाययोजना, विजेचा धोका होणार कमी….

पुणे : राज्यात सध्या अवकाळी पावसाचा जोर सुरु झाला आहे. त्याचबरोबर वीज पडण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते. वीज कोसळल्याने जनावरे, माणसे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. विशेषतः ग्रामीण भागात शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि मोकळ्या जागेत असलेल्या जनावरांना वीज पडण्याचा मोठा धोका असतो.
त्यामुळे या संकटाला तोंड देण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. वीज पडण्याच्या घटना मुख्यतः ढगांमधील विद्युत प्रभारांच्या संतुलन बिघडल्यामुळे होतात. जास्त आर्द्रता, ढगांचा घर्षणाचा परिणाम आणि हवामानातील वेगवान बदल यामुळे वीज पडण्याच्या संधी वाढतात.
भारतातील बहुतांश भागात हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरूवातीला अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असते. अशा वेळी शेतीत काम करणारे शेतकरी, मोकळ्या मैदानात असलेली जनावरे आणि उघड्यावर फिरणारे लोक यांना मोठा धोका असतो.
वीज पडण्यापासून बचाव करण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना…
मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे टाळा..
विजेच्या गडगडाटाच्या वेळी मोबाइल फोनचा सतत वापर करणे टाळा.घरातील टिव्ही, फ्रीज,इंटरनेट राऊटर, मिक्सर आणि इतर विद्युत उपकरणांचे प्लग काढून ठेवा.जर शक्य असेल तर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवा, कारण वीज पडल्यास त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो.
जनावरांसाठी विशेष खबरदारी..
जनावरे मोकळ्या जागेत बांधू नयेत, त्यांना शेड किंवा सुरक्षित जागेत ठेवावे. पावसाळ्यात गोठ्यांची वीजवाहिनी योग्यरीत्या जोडलेली आहे का याची तपासणी करावी. विजेच्या तारा जर शेतात लोंबकळत असतील तर त्वरित विद्युत वितरण कंपनीला कळवावे.
सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या..
वीज चमकत असताना आणि पाऊस पडत असताना शक्यतो मोकळ्या जागेत जाऊ नका. सुरक्षित ठिकाणी म्हणजेच इमारतीच्या आत किंवा मजबूत छपराखाली आसरा घ्या. झाडाखाली उभे राहू नका, कारण उंच झाडांवर वीज कोसळण्याची शक्यता जास्त असते.
धातूच्या वस्तूंना स्पर्श करू नका..
छतावरील लोखंडी पत्रे, विजेचे खांब, वीजवाहक तारांना हात लावू नका. हातात धातूच्या वस्तू (छत्री, काठी, बॅगची लोखंडी साखळी) असल्यास त्या दूर ठेवा. मोटारसायकल किंवा सायकलवर प्रवास करणे टाळा, कारण धातू विजेचा चांगला वाहक आहे.