सोमेश्वरला पुरुषोत्तम जगताप व युगेंद्र पवार यांच्या पॅनेलचे अक्षरशः पानिपत; सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलचे निंबूत-खंडाळा गटातच तिन्ही उमेदवार साडेचार हजार मतांच्या फरकाने आघाडीवर…

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचं खातं उघडलं आहे. ब वर्ग प्रतिनिधी गटातून संग्राम सोरटे यांनी विजय मिळवला असून, त्यानंतर अ गटातील सर्वसाधारण गटाच्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निंबूत-खंडाळा गटातील मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलच्या तीनही उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालकांपैकी १५ संचालक सर्वसाधारण गटातून निवडून येतात. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सर्वसाधारण गटाचे पाच गट असून, प्रत्येक गटातून तीन संचालक निवडले जातात. सध्या निंबूत-खंडाळा गटाची मतमोजणी सुरू असून, या गटातील आघाडीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
निंबूत-खंडाळा गटात राष्ट्रवादीच्या तीनही उमेदवारांची आघाडी


निंबूत-खंडाळा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलचे अभिजीत काकडे, प्रमोद काकडे आणि डॉ. वसंत दगडे यांनी आघाडी घेतली आहे. या तिन्ही उमेदवारांनी सुमारे ४ हजार ते ४ हजार ५०० मतांची आघाडी मिळवल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या स्थानावर कारखान्याचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या लोकनेते अजितदादा पवार पॅनेलचे उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या गटातील मतमोजणीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घेतलेल्या आघाडीमुळे सर्वसाधारण गटातील उर्वरित १५ जागांच्या निकालाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मतदारांनी पॅनेलनुसार मतदान केल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, क्रॉस व्होटिंग झाल्याचे चित्र अद्याप दिसून आलेले नाही. त्यामुळे सर्वसाधारण गटातील इतर जागांवरही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अंतिम निकालासाठी मतमोजणी पूर्ण होणे आवश्यक आहे.
संग्राम सोरटेंनी ब वर्ग गटातून उघडलं विजयाचं खातं
दरम्यान, ब वर्ग प्रतिनिधी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम सोरटे यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांना एकूण १३१ मतांपैकी तब्बल ९२ मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांनी दणदणीत विजय नोंदवला आहे. त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ब वर्ग गटातून विजय मिळवल्यानंतर आता सर्वसाधारण गटातील मतमोजणीचा निकाल काय लागणार, याकडे सभासदांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
