‘चुका सरकारच्या आणि फटका जनतेला?’ राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना खरमरीत पत्र; आर्थिक धोरणांवर जोरदार सवाल…


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोन्याची खरेदी कमी करण्यासह पेट्रोल-डिझेलचा वापर मर्यादित ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना खुले पत्र लिहित केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली आहे.

अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना काटकसरीचा सल्ला देताना सोन्याची खरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, परदेश दौरे मर्यादित ठेवा आणि शक्य असेल तिथे ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारा, असे आवाहन केले होते. या विधानानंतर देशभरात चर्चांना उधाण आले असतानाच राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले की, देशाची आणि राज्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक असताना सरकारकडून स्पष्ट माहिती दिली जात नाही. कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही नागरिकांकडून महागड्या दराने पेट्रोल-डिझेलची वसुली करण्यात आली, मग त्या लाखो कोटी रुपयांचे नेमके काय झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सामान्य नागरिकांना काटकसर करण्याचा सल्ला देताना सत्ताधारी नेत्यांचे मोठमोठे ताफे, प्रचार दौरे आणि खर्चिक कार्यक्रम सुरूच असतात, याकडे लक्ष वेधत राज ठाकरे यांनी सरकारवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला. काटकसर जनतेनेच का करावी, असा थेट प्रश्नही त्यांनी विचारला.

महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेचाही उल्लेख करत त्यांनी अशा योजनांमुळे अर्थव्यवस्थेवर ताण वाढत असल्याचे म्हटले. निवडणुका जिंकण्यासाठी ‘रेवड्या’ वाटण्याची पद्धत थांबवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवरही त्यांनी टीका केली. नागरिकांना परदेश प्रवास कमी करण्याचा सल्ला देण्यापूर्वी सरकारने स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्राच्या शेवटी राज ठाकरे यांनी अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती जनतेसमोर मांडावी, संसदेत यावर सविस्तर चर्चा घडवून आणावी आणि सरकार पुढे कोणती पावले उचलणार आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!