बारशाच्या उंबरठ्यावर मृत्यू, मुलगी झाल्याचा राग की पैशांचा तगादा? अस्मिता काटकर प्रकरणाने कोल्हापूर हादरले

कोल्हापूर : राजारामपुरी परिसरातील अस्मिता प्रतीकसिंह काटकर (वय २७) यांच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी जन्मलेल्या मुलीच्या बारशाची तयारी घरात सुरू असताना रविवारी दुपारी अस्मिता राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत हा आत्महत्येचा नव्हे, तर हत्येचा प्रकार असल्याचा दावा केला आहे.

अस्मिताचे लग्न वर्षभरापूर्वी झाले होते. माहेरच्या मंडळींच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतरपासूनच रोख रक्कम व इतर खर्चांसाठी वारंवार मागण्या होत होत्या. त्यांनी अनेकदा ऑनलाइन आणि प्रत्यक्ष स्वरूपात पैसे दिल्याचाही दावा केला आहे. मुलीच्या बारशासाठी तब्बल ५२ हजार रुपयांचा पाळणा मागविण्यात आला होता आणि समारंभ मोठ्या थाटात करण्यासाठी तगादा लावला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
अस्मिताच्या आई-वडिलांनी आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. सासरकडील मंडळींनी मुलगा होईल या अपेक्षेने आधीच मुलांच्या कपड्यांची खरेदी केली होती. मात्र मुलगी झाल्यानंतर अस्मिताचा मानसिक छळ वाढल्याचा त्यांचा दावा आहे. सासू, सासरे, पती आणि नणंद यांनीच आपल्या मुलीला जगू दिले नाही, असा थेट आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

घटनेच्या काही दिवसांपूर्वी अस्मिताने आई-वडिलांशी बोलताना बारसे उत्साहात करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, कुटुंबावर आधीच रुग्णालयीन खर्चाचा ताण असल्याचे वडिलांनी तिला सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून गळ्यावर काही जखमांचे निशाण आढळल्याने व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. लग्नानंतर सात वर्षांच्या आत विवाहितेचा मृत्यू झाल्याने न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे. तपासाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार असले, तरी या घटनेने प्रसूतीनंतरच्या महिलांच्या मानसिक आरोग्यापासून ते कौटुंबिक छळाच्या प्रश्नांपर्यंत अनेक गंभीर मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत.