‘पहाटेच्या शपथविधीची संपूर्ण माहिती पवारांना होती, पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी हात झटकले’; अनिल पाटील यांच्या दाव्याने राजकारणात नवा भूकंप

मुंबई : राज्यातील सत्तासमीकरणांच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी २०१९ मधील पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या मते, तत्कालीन घडामोडींची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना होती; मात्र शपथविधीनंतर अवघ्या एका दिवसात त्यांनी स्वतःला या प्रक्रियेपासून दूर केले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पहाटे पार पडलेल्या या शपथविधीने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. मात्र, हे सरकार काहीच दिवसांत कोसळले आणि पुढे महाविकास आघाडीची स्थापना झाली.
अनिल पाटील यांनी यावेळी गेल्या दशकातील अनेक राजकीय घडामोडींचा उल्लेख केला. २०१४ मध्ये शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता, तो काही दिवसांत मागे घेण्यात आला. २०१७ मध्ये शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपसोबत सत्ता स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती; मात्र तीही ऐनवेळी थांबली. २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्ताबदलाच्या काही काळ आधी राष्ट्रवादीतही सत्तेत सहभागी होण्याबाबत हालचाली सुरू होत्या, असा दावाही त्यांनी केला.

या वारंवार बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील परस्पर विश्वासावर परिणाम झाल्याची भावना निर्माण झाल्याचे पाटील म्हणाले. “शरद पवार प्रत्यक्ष एनडीएमध्ये सहभागी झाल्याशिवाय अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून संभ्रम पसरवला जात असल्याचा आरोप केला. पडताळणीदरम्यान ज्या महिलांची नावे वगळली गेली, त्यामागे दुहेरी नोंदणी किंवा ई-केवायसी अपूर्ण राहणे यांसारखी कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल पाटील यांच्या या दाव्यांमुळे २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीभोवतीचे गूढ पुन्हा चर्चेत आले असून, आता शरद पवार आणि त्यांच्या पक्षाकडून येणाऱ्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.