मुख्यमंत्री-गडकरींचा दौरा संपला अन् काही तासांत रक्तरंजित घटना; १० रुपयांच्या चहावरून नागपुरात तरुणाची हत्या


नागपूर : शहरातील कपिलनगर परिसरात किरकोळ कारणातून घडलेल्या हत्येच्या घटनेने नागरिकांना हादरवून सोडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रम पार पडलेल्या परिसरालगतच काही तासांत ही घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सहारे पेट्रोल पंपाजवळील चहाच्या टपरीवर रविवारी दुपारी मनोज विश्वनाथ यादव हे चहा पिण्यासाठी आले होते. मनोज यादव हे डेकोरेशन साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनाचे चालक होते. चहाचे अवघे दहा रुपये देण्यावरून त्यांचा आणि टपरी चालक कैलास गणवीर यांच्यात शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला.

संतापाच्या भरात कैलास गणवीर याने धारदार चाकूने मनोज यादव यांच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या मनोज यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आरोपीला काही तासांत ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

विशेष म्हणजे, ज्या परिसरात ही घटना घडली त्याच भागात काही तासांपूर्वी नागपूर महानगरपालिकेच्या सुदर्शन समाजासाठीच्या गृहनिर्माण योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी उपस्थित होते. त्यांच्या दौऱ्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कार्यक्रम शांततेत पार पडल्यानंतर अल्पावधीतच भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ कारणातून झालेल्या या रक्तरंजित घटनेने क्षणिक रागाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आणले असून, शहरातील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!