मृत्यूशी १२२ दिवस झुंज अन् चमत्कारिक पुनरागमन! ३ हार्ट अटॅक, शरीराला लकवा… तरीही १४ वर्षीय लक्षित जिंकला जीवनाची लढाई

नवी दिल्ली : इच्छाशक्ती, कुटुंबाचा आधार आणि डॉक्टरांचे अथक प्रयत्न असतील तर अशक्य वाटणारी लढाईही जिंकता येते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे दिल्लीतील १४ वर्षीय लक्षित. तब्बल १२२ दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर, तीन वेळा हृदयविकाराचा झटका येऊनही आणि संपूर्ण शरीराला लकवा मारल्यानंतर या चिमुकल्याने मृत्यूला हरवत पुन्हा आयुष्याची वाट धरली आहे.

लक्षितच्या आजाराची सुरुवात साध्या पोटदुखी आणि अशक्तपणापासून झाली होती. दोन आठवड्यांपूर्वी त्याला अतिसाराचा त्रास झाला होता. मात्र, हा साधा संसर्ग पुढे जीवघेणा ठरेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. त्याला ‘गिलेन-बेरे सिंड्रोम’च्या सर्वात धोकादायक प्रकारांपैकी एक असलेल्या ‘अक्युट मोटर एक्सोनल न्युरोपॅथी’चा फटका बसला.
सुरुवातीला त्याच्या पायांतील ताकद कमी झाली. काही दिवसांतच तो चालू शकत नव्हता. त्यानंतर लकवा हळूहळू संपूर्ण शरीरात पसरत गेला. हात, छातीचे स्नायू आणि श्वसनसंस्थेवर परिणाम झाल्याने लक्षितला श्वास घेणंही अशक्य झालं. त्याच्या फुफ्फुसांनी काम करणे बंद केल्याने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

२६ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी ट्रॅकिओस्टॉमी करून श्वसनासाठी नळी बसवली. उपचारासाठी महागडी इंजेक्शन्सही देण्यात आली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हा खर्च त्यांच्यासाठी मोठे संकट ठरला.

४ नोव्हेंबर रोजी लक्षितला व्हेंटिलेटर सपोर्टवर स्वामी दयानंद रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्याच्या वडिलांचे मासिक उत्पन्न अवघे १५ ते २० हजार रुपये असून, कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण होता. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या उपचारासाठी विशेष प्रयत्न केले आणि अनेक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या.
या काळात लक्षितला तीन वेळा हृदयविकाराचे झटके आले. अनेकदा परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटत होती. तरीही डॉक्टरांनी हार मानली नाही. अखेर चार महिन्यांच्या संघर्षानंतर लक्षितने मृत्यूवर मात केली आणि स्वतःच्या पायावर उभा राहून रुग्णालयातून घरी परतला.
आज लक्षितची कहाणी केवळ वैद्यकीय चमत्कार नाही, तर आशा, जिद्द आणि मानवी संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास ठरत आहे.