‘पवारसाहेब, एकदा माझं ऐका… पाया पडतो, राजकारणही सोडतो!’ वडेट्टीवारांचं मोठं विधान; डिलिमिटेशनवरून नेमकं काय घडलं?

नागपूर : शरद पवारांच्या एका निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या भावनिक आवाहनाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘मी शरद पवारांची माफी मागेन, त्यांच्या पाया पडेन. एवढेच नव्हे, तर त्यांनी सांगितल्यास राजकारणही सोडेन; पण त्यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ नये,’ अशी आर्त विनंती वडेट्टीवार यांनी केली. त्यांच्या या विधानामुळे पवार आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय समीकरणांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार यांच्याबाबत यापूर्वी केलेल्या विधानावरून निर्माण झालेल्या वादानंतर वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पवार यांना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. आपण केवळ जनतेच्या भावना मांडल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये शरद पवार हे विचारांनी सोबत राहिले आहेत. त्यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेली भूमिका आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतांचा विचार करून आपण भाष्य केल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. डिलिमिटेशन विधेयकाचा मसुदा अद्याप जनतेसमोर स्पष्टपणे आलेला नाही. मात्र, कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक मंजूर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. मसुदा समोर आल्यानंतर देशभरातून त्याला मोठा विरोध होईल, असा दावाही त्यांनी केला. या प्रक्रियेमागे देशाच्या राजकीय व्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारे षड्यंत्र असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

८५० जागांची वाट कशासाठी? महिला आरक्षणावर काँग्रेसची भूमिका

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही वडेट्टीवार यांनी भाजपला लक्ष्य केले. लोकसभेच्या जागा ८५० झाल्यानंतर महिला आरक्षण लागू करण्याची भूमिका मांडली जात असली, तरी त्यासाठी नव्या जागांची प्रतीक्षा करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. सध्याच्या ५४३ जागांमध्येच महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यावे, अशी काँग्रेसची मागणी आहे.
आसाममध्ये मतदारसंघ पुनर्रचनेदरम्यान मोठे बदल करण्यात आल्याचा आरोप करत काही मतदारसंघांची लांबी ४०० किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीत कोण जिंकणार, हे आधीच ठरवले जात असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत लोकशाहीसमोरील धोके स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर आणि नियुक्ती प्रक्रियेवरही वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवडलेली व्यक्ती निवडणूक आयोगाचे नेतृत्व करते, असा आरोप त्यांनी केला. मतदारसंघांची रचना सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले. देशाला पुन्हा हुकूमशाहीच्या दिशेने नेले जात असल्याचा आरोप करत लोकशाही टिकवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, काँग्रेसचे खासदार पक्षासोबतच राहतील आणि पक्षातून कोणीही फुटणार नाही, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे खासदार डिलिमिटेशनच्या बाजूने असते, तर हे विधेयक केव्हाच मंजूर झाले असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता या संपूर्ण प्रकरणात शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेतात, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे. वडेट्टीवारांच्या माफीनाम्याच्या तयारीच्या विधानानंतर पवार आपली भूमिका बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
